Pakistan Will Disintegrate If It Keeps Supporting Terrorism: Rajnath Singh | Video - 'दहशतवाद न थांबवल्यास पाकिस्तानचे तुकडे होतील'
Video - 'दहशतवाद न थांबवल्यास पाकिस्तानचे तुकडे होतील'

ठळक मुद्देसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत. 'पाकिस्तानने दहशतवादाचा पुरस्कार करणे थांबवले नाही तर पाकिस्तानचे तुकडे होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही' 'काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पचवणे पाकिस्तानला अवघड जात आहे.'

सुरत - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत. 'पाकिस्तानने दहशतवादाचा पुरस्कार करणे थांबवले नाही तर पाकिस्तानचे तुकडे होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही' असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या 122 सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी शनिवारी (14 सप्टेंबर) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.  

पाकिस्तानी नागरिकांनी नियंत्रण रेषा (एलओसी) पार करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जवान त्यांना पुन्हा मागे फिरायची संधी देणार नाहीत, असा इशाराही राजनाथ यांनी यावेळी दिला आहे. 'काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पचवणे पाकिस्तानला अवघड जात आहे. या मुद्द्यावरून त्यांनी संयुक्त राष्ट्रांपर्यंत जाण्याचा व त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही' असं देखील राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 

'स्वातंत्र्यानंतर भारतातील अल्पसंख्याकांच्या लोकसंख्येत वाढ झाली. परंतु पाकिस्तानमध्ये शीख, बौद्ध व इतरांचे मानवी हक्क पायदळी तुडवण्याच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अन्य कोणी पाकिस्तानचे तुकडे करण्याची गरज नाही. दहशतवादाला पाठीशी घालणे थांबवले नाही, तर पाकिस्तानचे आपोआप तुकडे होतील' असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. याआधी त्यांनी काश्मीर हा नेहमी भारताचा भाग राहिलेला आहे. काश्मीर पाकिस्तानचा भाग होताच कधी? पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही, असे  ठणकावले होते. ''मी काश्मीर हा नेहमी भारताचा भाग राहिलेला आहे. मी पाकिस्तानला विचारू इच्छितो की, काश्मीर पाकिस्तानचा भाग होताच कधी? ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी रडगाणे गात असता. पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही.'' पाकिस्तानने त्यांच्या ताब्यातील काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे लक्ष द्यावे,असे राजनाथ यांनी पाकिस्तानला सुनावले होते. 

''काश्मीर प्रश्नाबाबत माझी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसोबतसुद्धा चर्चा झाली. त्यावेळी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी कलम 370 हटवणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे मान्य केले. आमचा शेजारी असेल्या पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे. मात्र त्याआधी पाकिस्तानने भारताविरोधात सुरू असलेला दहशतवादाचा वापर बंद केला पाहिजे. जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादाचा वापर भारताला अस्थिर करण्यासाठी करण्यात येईल तोपर्यंत आम्ही पाकिस्तानशी चर्चा कशी काय करू शकतो,'' अशी विचारणाही राजनाथ सिंह यांनी केली होती. 

 

 


Web Title: Pakistan Will Disintegrate If It Keeps Supporting Terrorism: Rajnath Singh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.