पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात 1 जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 19:15 IST2019-03-18T19:14:58+5:302019-03-18T19:15:28+5:30
काश्मीर सीमेलगत पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील केरी, बटल यापरिसरात रविवारपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात 1 जवान शहीद
जम्मू - काश्मीर सीमेलगत पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील केरी, बटल यापरिसरात रविवारपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला असून इतर 8 जवान जखमी आहेत. जखमी जवानांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
करमजीत सिंह असं या शहीद जवानाचे नाव आहे. गोळीबारीत 24 वर्षाचा शिपाई करमजीत सिंह गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान करमजीत सिंह यांची प्राणज्योत मावळली. करमजीत सिंह पंजाब राज्यातील जनेर गावचे रहिवाशी होते. करमजीत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1994 साली झाला होता.
पहाटे साडेपाच पासून साडे सातपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार सुरु होता. भारतीय लष्करानेही पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारतीय लष्कराचे नुकसान झालं आहे. याआधीही जम्मू काश्मीरच्या राजोरी जिल्ह्यामधील सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता मात्र भारतीय जवानांना पाकिस्तानला चोख उत्तर दिले. पाकिस्तानने रविवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास गोळीबार सुरु केला. त्यात बलडो गावाचे रहिवाशी रमेश लाल यांची जनावरे जखमी झाली. रहिवाशी परिसरात पाकिस्तानकडून हा गोळीबार करण्यात आला. मात्र त्यात फारसे नुकसान झालं नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान लष्कराकडून सीमाभागातील गावांना निशाणा बनवत गोळीबारी केली जातेय. त्याला प्रत्युत्तर भारतीय जवानांनीही दिले आहे. यामध्ये पाकिस्तान लष्कराची एक पोस्ट उद्धवस्त केल्याचंही समजतंय. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला होता. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले होते.मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाचं वातावरण आहे.