दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने ६-७ मे रोजी ड्रोनद्वारे भारतावर हल्ला केला. मात्र, पाकचा प्रत्येक हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला. पाकिस्तानला जम्मू-काश्मीर, गुजरात आणि पंजाबमधील शहरांना लक्ष्य करायचे होते. मात्र, त्यांची प्रत्येक योजना उधळून लावली गेली. आता भारतीय सैन्याने सुवर्ण मंदिर आणि अमृतसर शहराचे संरक्षण कसे केले, हे सगळ्यांना व्हिडीओमधून दाखवले आहे.
पंजाबमधील अमृतसर येथे भारतीय सैन्याने आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, एल-७० हवाई संरक्षण तोफा यासह भारतीय हवाई संरक्षण प्रणालींनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि पंजाबमधील शहरांचे पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून कसे संरक्षण केले याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानने डागलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष देखील दाखवले, जे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने अडवले आणि पाडले.
सुवर्ण मंदिरावर होते पाकचे लक्ष्य१५ व्या इन्फंट्री डिव्हिजनचे जीओसी मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्री म्हणाले, "पाकिस्तानी सैन्याचे कोणतेही विशिष्ट लक्ष्य नव्हते हे जाणून, आम्हाला अंदाज होता की ते भारतीय लष्कराच्या प्रतिष्ठानांना, धार्मिक स्थळांसह नागरी स्थानांना लक्ष्य करतील. यापैकी सुवर्ण मंदिर सर्वात प्रमुख होते. सुवर्ण मंदिराला संपूर्ण हवाई संरक्षण कवच देण्यासाठी आम्ही अतिरिक्त आधुनिक शस्त्रे जमवली. ८ मे रोजी सकाळच्या अंधारात, पाकिस्तानने मानवरहित हवाई शस्त्रे, प्रामुख्याने ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी मोठा हवाई हल्ला केला."
पुढे ते म्हणाले की , "आम्हाला या हल्ल्याची अपेक्षा होती, त्या दृष्टीने आम्ही पूर्णपणे तयार होतो. आमच्या धाडसी आणि सतर्क आर्मी एअर डिफेन्स गनर्सनी पाकिस्तानी सैन्याचे नापाक हेतू हाणून पाडले आणि सुवर्ण मंदिरावर लक्ष्य केलेले सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली. अशाप्रकारे आपल्या पवित्र सुवर्ण मंदिरावर एकही ओरखडा येऊ दिला नाही."