शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाचे उत्तर पाकिस्तानने शत्रुत्व व विश्वासघाताने दिले - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 06:11 IST2025-03-17T06:11:09+5:302025-03-17T06:11:50+5:30

लेक्स फ्रीडमनसोबत तीन तासांच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कडाडले

Pakistan responded to every attempt at peace with hostility and betrayal says pm modi | शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाचे उत्तर पाकिस्तानने शत्रुत्व व विश्वासघाताने दिले - नरेंद्र मोदी

शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाचे उत्तर पाकिस्तानने शत्रुत्व व विश्वासघाताने दिले - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : मी माझ्या शपथविधी समारंभासाठी पाकिस्तानला आमंत्रित केले होते, परंतु भारताकडून केलेल्या शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाचे उत्तर पाकिस्तानने शत्रुत्व व विश्वासघाताने दिले, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पाकला सद्बुद्धी प्राप्त होईल व तो देश शांततेचा मार्ग अवलंबील, अशी आशा आहे, असेही ते म्हणाले.

लेक्स फ्रीडमनबरोबरच्या तीन तासांच्या एका पॉडकास्टमध्ये त्यांनी म्हटले की, भारतीय वैदिक संत व स्वामी विवेकानंद यांनी जे काही शिकवले आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघही तेच शिकवत आहे. मोदी म्हणाले की, पाकिस्तानच्या लोकांनाही शांतता पाहिजे, असे मला वाटते. कारण, तेही संघर्ष, अशांतता व सतत दहशतवादाच्या सावटाखाली राहून थकलेले असावेत. तेथे निरागस बालके मारली जातात. माझी ताकद माझ्या नावात नाही, तर १.४ अब्ज भारतीय व देशाच्या शाश्वत संस्कृती व वारशाच्या समर्थनात सामावलेली आहे. मी टीकेचे स्वागत करतो, कारण ती लोकशाहीचा आत्मा आहे, असेही ते म्हणाले.

‘परीक्षा पे चर्चा’बद्दल...
विद्यार्थ्यांच्या क्षमतांची अंतिम चाचणी या दृष्टीने परीक्षांकडे बघितले जाऊ नये. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी थेट संवाद साधण्याची संधी मला मिळाली. 

गोधरा प्रकरणाबाबत...
गोधरा दंगल प्रकरणाच्या बाबतीत जाणीवपूर्वक फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आले. २००२ पूर्वी गुजरात मध्ये अडीचशेहून अधिक जातीय, धार्मिक दंगली झाल्या. 
इतकेच नव्हे, तर त्यावेळी दहशतवादी कारवायाही मोठ्या प्रमाणावर होत होत्या. तथापि, २००२ नंतर गुजरातमध्ये दंगलीची एकही घटना घडली नाही. 
लोकांनी गोधरा कांडानंतर माझी प्रतिमा मलीन करण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. मात्र, देशातील न्यायव्यवस्थेने मला न्याय दिला आणि या प्रकरणातून माझी निर्दोष मुक्तता केली.

ट्रम्प यांच्याविषयी...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व माझ्यात एक विश्वासाचे नाते आहे. आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने एकमेकांच्या संपर्कात राहतो. कारण, आम्ही राष्ट्रहित सर्वोच्च मानतो. ‘राष्ट्र प्रथम’ आणि ‘भारत प्रथम’ हे माझे स्वतःचे तत्त्वज्ञान आहे, तर ट्रम्प यांचा ‘अमेरिका प्रथम’ हा नारा आहे. 
२०१९मध्ये ह्यूस्टनमध्ये खचाखच भरलेल्या एनआरजी स्टेडियममध्ये ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम ट्रम्प यांनी प्रेक्षकांत बसून पाहिला होता. ती त्यांची विनम्रता आहे. नंतर त्यांनी सुरक्षेची पर्वा न करता माझ्यासोबत ते पूर्ण स्टेडियममध्ये फिरले.

सरकारबद्दल...
२०१४ मध्ये माझे सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम शासकीय कल्याण योजनांमधील दहा कोटी बनावट लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना बाहेर काढले. त्यामुळे डीबीटी योजनेचा फायदा खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकला. यामुळे सरकारचे तीन लाख कोटी रुपये वाचले. शासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी अडचणीचे कायदे व नियम रद्द केले.

माझे सरकार निवडणूक केंद्रित सरकार नाही तर जनता केंद्रित सरकार आहे. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचावा, या एका सूत्रावर आपले सरकार काम करते.
 

Web Title: Pakistan responded to every attempt at peace with hostility and betrayal says pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.