पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:42 IST2026-04-03T17:40:18+5:302026-04-03T17:42:04+5:30
बदलेलं काश्मीर पाहून मला आनंद होतो. हे एक नवीन काश्मीर आहे. आज काश्मीर सुधारले आहे. इथे प्रत्येक ठिकाणी समृद्धी आणि पर्यटन वाढले आहे. इथले लोक प्रगत झालेत असं इलियासी यांनी सांगितले.

पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
श्रीनगर - पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होईल असं विधान ऑल इंडिया इमाम ऑर्गनाइजेशनचे मुख्य इमाम उमर अहमद इलियासी यांनी केले आहे. त्यासोबतच कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या बदलांचेही त्यांनी कौतुक केले.
उमर अहमद इलियासी यांनी म्हटलं की, आज काश्मीर इथं उभं राहून शेजारील राष्ट्राला एकच सांगतो, पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. निश्चितपणे ते भारतात पुन्हा समाविष्ट होईल. पीओकेतील लोकांची जनमत चाचणी करायला हवी. तिथल्या लोकांना भारतासोबत यायचे आहे. ते जम्मू काश्मीरमध्ये होत असलेला विकास पाहताहेत. जर वरंच्यांनी ठरवले तर लवकरच या लोकांची घरवापसी होईल. आज काश्मीर ज्यारितीने पुढे जात आहे ते पाहता पीओके लवकरच भारतातात येईल अशी भविष्यवाणीच त्यांनी केली.
तसेच बदलेलं काश्मीर पाहून मला आनंद होतो. हे एक नवीन काश्मीर आहे. आज काश्मीर सुधारले आहे. इथे प्रत्येक ठिकाणी समृद्धी आणि पर्यटन वाढले आहे. इथले लोक प्रगत झालेत. एक काळ होता जेव्हा इथले युवा आणि लहान मुले दगडफेक करायचे परंतु आज त्या मुलांच्या हातात पुस्तक आले आहे. ते शिक्षण घेत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनात काही काळ घसरण झाली होती. मात्र आता पर्यटकांनी पुन्हा काश्मीरला यायला हवे. इथे दहशतीचे वातावरण नाही. युद्धातून विध्वंस येतो, त्यामुळे संपूर्ण जगात शांतता राहावी असंही उमर अहमद इलियासी यांनी म्हटलं.
जाणून घ्या कोण आहेत उमर अहमद इलियासी ?
उमर अहमद इलियासी ऑल इंडिया इमाम ऑर्गनाइजेशनचे मुख्य इमाम आहेत. त्यांनी पंजाबच्या भगत युनिवर्सिटीतून पीएचडी पदवी घेतली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मशिदीतील इमामाने इतकी मोठी पदवी मिळवली. इलियासी हे निवडक इस्लामी विद्वानांपैकी एक आहेत जे कट्टरता आणि दहशतवादाविरोधात स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेतात. २०२२ मध्ये दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील एका मशिदीत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर ते प्रकाशझोतात आले. उमर अहमद इलियासी यांनी तर मोहन भागवत यांना 'राष्ट्रपिता' म्हणून संबोधले होते.