“pakistan occupied kashmir is ours; One day it will be in india” | ''पाकव्याप्त काश्मीर आमचेच; एक दिवस ताब्यात येईलच''

''पाकव्याप्त काश्मीर आमचेच; एक दिवस ताब्यात येईलच''

नवी दिल्ली : पाकिस्तानने बळकाविलेला काश्मीरचा भागही आमचाच आहे, अशी भारताची ठाम भूमिका आहे. हे पाकव्याप्त काश्मीरही एक दिवस आमच्या ताब्यात येईल, अशी आम्हाला आशा आहे, असे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले. मोदी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्रालयाच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी असेही सांगितले की, दहशतवाद बंद झाल्याखेरीज पाकिस्तानशी कोणतीही बोलणी होणार नाहीत आणि जेव्हा केव्हा बोलणी होतील, तेव्हा फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दलच असतील. हे या आधीही अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे.

आम्ही चर्चेचा प्रस्ताव दिला होता, पण भारताने तो अव्हेरला, असे पाकिस्तान म्हणते. त्याविषयी विचारता परराष्ट्रमंत्री म्हणाले की, कोणतीही कृती न करता ते फक्त बोलतात हीच खरी समस्या आहे. भारताची भूमिका अवाजवी किंवा जगावेगळी मुळीच नाही. शेजारी देश आपल्याविरुद्ध कितीही उचापती करत असला तरी त्याच्याशी चर्चा करणारा एकही देश जगात तुम्हाला सापडणार नाही. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबद्दल कोण काय बोलते याची आम्ही चिंता करत नाही. अमेरिका व भारताचे संबंध अतिशय चांगले आहेत. संबंध जसे दृढ होतात तसे काही मुद्देही समोर येतात. त्या मुद्द्यांवर अमेरिकेशी चर्चा करून तोडगा काढू असेही जयशंकर म्हणाले.
डॉ. नाईक भारतास हवेच आहेत
अतिरेकी कारवायांना चिथावणी दिल्याच्या आरोपावरून खटले सुरू असलेले वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक हे भारतास नक्कीच हवे आहेत व त्यांच्या प्रत्यार्पणासाठीही भारत आग्रही आहे असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. डॉ. नाईक यांचे वास्तव्य सध्या मलेशियात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही दिवसांपूर्वीच भेट झाली पण डॉ. नाईक यांच्या प्रत्यार्पणाविषयी त्यांनी काही विषय काढला नाही. नाईक यांना स्वीकारायला कोणताच देश तयार नाही. त्यामुळे त्यांचे प्रत्यार्पण करायचे म्हटले तरी त्यांना पाठवायचे कुठे असा प्रश्न असल्याचे वक्तव्य मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांनी केले आहे. याचे ठाम खंडन जयशंकर यांनी केले. रशियात मोदी महाथीर यांना भेटले तेव्हा नाईक यांच्या प्रत्यार्पणाचा विषय निघाला होता व ते भारताला हवे आहेत असे स्पष्ट केले होते असे जयशंकर म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: “pakistan occupied kashmir is ours; One day it will be in india”

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.