लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया केल्यामुळे पाकिस्तानबरोबर असलेला सिंधू जल करार भारताने स्थगित केला. आता अफगाणिस्तानातूनही पाकिस्तानची जलकोंडी होण्याची दाट शक्यता आहे. भारत व अफगाणिस्तानचे उत्तम संबंध आहेत. अफगाणिस्तानमध्ये काबुल नदीवरील शाहतूत धरण बांधण्यासाठी भारताने सहकार्य दिले असून, ते पूर्ण झाल्यास तिथून पाकिस्तानला होणारा जलपुरवठा कमी होऊ शकतो.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी यांच्यामध्ये गुरुवारी रात्री दूरध्वनीवरून चर्चा झाली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने अफगाणिस्तानशी प्रथमच चर्चा केली आहे.
संवेदनशील विषय
अफगाणच्या हिंदूकुश पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या व पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात प्रवेश करणाऱ्या काबुल नदीवर बांधले जाणारे हे धरण हा पाकिस्तानसाठी संवेदनशील विषय आहे. काबुल नदी हा सिंधू नदी प्रणालीचा भाग आहे.
कुणार धरणामुळेही अडचण? : कुणार नदीवर आणखी एक मोठा जलविद्युत प्रकल्प बांधण्याची तालिबान सरकारने घोषणा केली. हिंदूकुशमध्ये उगम पावणारी कुणार नदी पुढे काबुल नदीला मिळते व पाकिस्तानात प्रवेश करते. तिथे जलविद्युत प्रकल्प झाला तर पाकच्या पाणी पुरवठ्याला फटका बसणार आहे.