पाकिस्तान मोठी तयारी करतोय; राजस्थान सीमेवर टॉयलेटच्या नावाखाली बंकर बनविले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:10 IST2025-02-26T12:10:22+5:302025-02-26T12:10:43+5:30
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) त्यावर आक्षेप घेतला तेव्हा पाकने हे शौचालय असल्याचे सांगितले.

पाकिस्तान मोठी तयारी करतोय; राजस्थान सीमेवर टॉयलेटच्या नावाखाली बंकर बनविले...
बारमेर : पश्चिम राजस्थानला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तान सातत्याने आंतरराष्ट्रीय नियमांकडे दुर्लक्ष करत आहे. पाकने बारमेरच्या गद्रा भागात सीमेच्या आतमध्ये बेकायदेशीर बांधकाम करून बंकर बनवले आहेत.
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) त्यावर आक्षेप घेतला तेव्हा पाकने हे शौचालय असल्याचे सांगितले. राजस्थानला लागून असलेल्या अनेक सीमावर्ती भागात पाक सैनिकांच्या हालचाली सातत्याने वाढत आहेत. १५ दिवसांपूर्वी मोरवी आंतरराष्ट्रीय रेल्वे मार्गाजवळही पाकिस्तानी पर्यटकांचा मोठा समूह दिसला होता. (वृत्तसंस्था)
भारताची हालचाल 'त्यांना' कळतेय
'बीएसएफ'च्या सूत्रांनी सांगितले की, पाकच्या सैन्याने बांधलेले हे बंकर इतके जवळ आहे की पाकिस्तानी सैनिक भारतीय सैनिकांची हालचाल सहज टिपू शकतात. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून अशाप्रकारचे बांधकाम होत आहे. १५० मीटरच्या क्षेत्रात सीमेवर कोणतेही बांधकाम केले जाऊ शकत नाही. असे असतानाही पाककडून हे बंकर तयार करण्यात आले आहेत.
सुनसान भागात आता रेस्टॉरंटही
पाकिस्तानने सिंध क्षेत्राकडे जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये थार एक्स्प्रेस बंद झाल्यापासून हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य होता. मोरवी स्टेशन येथे पाक रेंजर्स क्वचितच दिसतात. मात्र, पाकिस्तानकडून येथे रेल्वे धावू लागल्याने गेल्या काही महिन्यांपासून सुनसान असलेल्या या भागात रेस्टॉरंटचे बांधकामही सुरू झाले आहे.
बेकायदा बांधकामावर नजर ठेवली जात आहे. आता आम्ही उच्चस्तरीय बैठक बोलविली आहे. पाकिस्तानी सैन्यावरही सतत नजर ठेवली जात आहे.
- राज कुमार, आयजी, बीएसएफ