पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 20:46 IST2025-11-07T20:34:37+5:302025-11-07T20:46:10+5:30
पाकिस्तानच्या अणुचाचण्यांच्या ट्रम्प यांच्या दाव्यांवर भारताने प्रतिक्रिया व्यक्त केली. 'हा पाकिस्तानचा इतिहास आहे. आम्ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टिप्पण्या गांभीर्याने घेत आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.

पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणु चाचणीबाबत मोठे विधान केले. त्यांनी पाकिस्तान अणु चाचणी घेत असल्याचा दावा केला. दरम्यान, आता या दाव्यावर भारताने प्रतिक्रिया व्यक्त केली. 'हा पाकिस्तानचा इतिहास आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टिप्पण्यांमुळे आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.
"पाकिस्तान चुकीच्या आणि बेकायदेशीर मार्गाने सर्वकाही करतो. पाकिस्तान गेल्या अनेक दशकांपासून अशा प्रकारे तस्करी करत आहे. ते निर्यात नियंत्रणांचे उल्लंघन करत आहे आणि गुप्तपणे भागीदारी करत आहे. आम्ही नेहमीच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष याकडे वेधले आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?
काही दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन दशकांच्या विश्रांतीनंतर अण्वस्त्र चाचणी पुन्हा सुरू करण्याच्या त्यांच्या योजनेचे समर्थन केले. पाकिस्तान आणि चीन सध्या अण्वस्त्र चाचणी करणाऱ्या देशांमध्ये आहेत. याच विधानाचा संदर्भ परराष्ट्र मंत्रायलयाने आज दिला.
उत्तर कोरिया चाचण्या करत आहे. पाकिस्तान देखील चाचण्या करत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, रशियाने पोसायडॉन अण्वस्त्रवाहू "सुपर टॉर्पेडो" ची चाचणी केली आहे. त्यांच्या निवेदनात ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. त्यांनी म्हटले की शस्त्रांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी चाचणी आवश्यक आहे.
"इतर देश चाचणी करतात, आणि आपण करत नाही. आपल्याला चाचणी करावीच लागेल. काही दिवसांपूर्वी रशियानेही वेगळ्या पातळीच्या चाचण्या घेण्याचे आश्वासन देऊन धमकी दिली होती. पण रशिया चाचणी करतो, चीन चाचणी करतो आणि आपणही चाचणी करणार आहोत, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.