जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील लष्कर अलर्टवर आहेत. दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव यांचे एक विधान समोर आले आहे. बाबा रामदेव यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. बाबा रामदेव म्हणाले की, पाकिस्तान आधीच अंतर्गत कलहाचा सामना करत आहे, अशा परिस्थितीत जर युद्ध झाले तर पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टिकू शकणार नाही.
रामदेव बाबा यांनी कडक शब्दात पाकिस्तानला सुनावले. "येत्या काही दिवसांत आपण कराचीमध्ये गुरुकुल बांधणार त्यानंतर लाहोरमध्ये बांधणार. पाकिस्तान स्वतःहून तुटून पडेल, असंही बाबा रामदेव म्हणाले.
बाबा रामदेव यांनी काल रविवारी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभाग घेतला.यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले की, पाकिस्तान स्वतःहून तुटून पडेल. बलुचिस्तानचे लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. या ठिकाणांची परिस्थिती पाकव्याप्त काश्मीर पेक्षाही वाईट आहे. पाकिस्तानकडे भारताशी लढण्याची ताकद नाही. ते युद्धात चार दिवस टिकू शकत नाही. मला वाटतं काही दिवसांत आपल्याला कराची आणि नंतर लाहोरमध्ये गुरुकुल स्थापन करावे लागेल.
भारत दहशतवादाच्या सूत्रधारांना धडा शिकवेल - भाजप
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही पाकिस्तानवर टीका केली. ते म्हणाले की, "पाकिस्तानने आपल्या सैन्यावरील विश्वास गमावला आहे. त्यांना प्रत्युत्तराची भीती वाटते. भारताने अद्याप पूर्ण प्रत्युत्तर दिलेले नाही. भारत दहशतवादाच्या सूत्रधारांचे तुकडे तुकडे करेल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत दहशतवादाच्या सूत्रधारांना धडा शिकवण्यास तयार आहे, असंही ते म्हणाले.
युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील सीमेवर लष्कर अलर्टवर आहेत. दरम्यान, आता ईराण या दोन्ही देशात शांतता राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची हे नवी दिल्ली भेटीपूर्वी सोमवारी इस्लामाबादच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर पाकिस्तानात जाणार आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अरघची यांची भेट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे अरघची पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी एक महत्त्वाची बैठक घेतील. त्यांची चर्चा पाकिस्तान आणि इराणमधील द्विपक्षीय संबंधांवर तसेच सध्याच्या प्रादेशिक परिस्थितीवर, विशेषतः अलीकडील पाकिस्तान-भारत तणावावर केंद्रित असणार आहे.