Pahalgam Terrorist Attack: दक्षिण काश्मिरातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांना मृत्यू झला आहे. पहलगाम पर्यटन भागातील बैसरन व्हॅलीमधील डोंगरावरून दहशतवादी खाली आले आणि त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांची नावे विचारून गोळ्या घातल्या. या हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी महिला आणि वृद्धांसह अनेकांना लक्ष्य केले.
या हल्यादरम्यानचे काही व्हिडिओदेखील समोर आले आहेत. यात, ठीक-ठिकाणी जखमी लोक रडताना आणि आक्रोश करताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये, एक पीडित महिला रडत रडत सांगत आहे की, "आम्ही भेळपुरी खात होतो, तेव्हा बाजूने दोन लोक आले आणि त्यापैकी एक जण म्हणाला, हा मुस्लीम दिसत नाही, घाला गोळी आणि त्यांनी माझ्या पतीला गोळी घातली."
'दहशतवाद्यांनी कलमा पढायला सांगितले अन्...' -सीएनएन-न्यूज१८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गोळी झाडण्यापूर्वी, कोण कोणत्या धर्माचे आहे, हे लक्षात यावे, यासाठी दहशतवाद्यांनी लोकांना 'कलमा' पढायला सांगितला. याशिवाय, दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची पँट काढायला सांगितली आणि त्यांचे ओळखपत्रही तपासल्याचे सूत्रांनी सांगितले.
माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. शोध मोहीम संपल्यानंतर, राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) एक पथक पहलगाममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.