पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या हल्ल्यामागे हात असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी देशवासियांकडून केली जात आहे. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून पाकिस्तारविरोधात कुटनीतिक पातळीवरून कारवाई केली जात आहे. तसेच पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशाराही दिला जात आहे. मात्र पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला पंधरवडा उलटता तरी दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात अद्याप कुठलीही मोठी कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता विरोधकांकडून सरकारला टीकेचं लक्ष्य करण्यात येऊ लागलं आहे. नरेंद्र मोदींविरोधात लोकसभा निवडणूक लढवणारे काँग्रेसचे नेते आणि उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनीही नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच भारतीय हवाई दलाकडे असलेल्या राफेल विमानांना खेळण्याची उपमा देत त्यांची खिल्ली उडवली आहे.
अजय राय यांनी खेळण्यातील राफेल विमान दाखवून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. त्यांनी या खेळण्याला लिंबू मिरची लटकवली. ते पुढे म्हणाले की, देशात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत. ते पाकिस्तानविरोधात प्रत्युत्तरदाखल कारवाई करण्याची मागणी करत आहेत, अशा शब्दात अजय राय यांनी संताप व्यक्त केला.
अजय राय यांनी पुढे म्हणाले की, आपले तरुण पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडले. केंद्र सरकार म्हणते की, आम्ही दहशतवाद्यांनी चिरडून टाकू. त्यासाठी फ्रान्समधून राफेल विमानंही आणण्यात आली. मात्र तीसुद्धा लिंबू मिरची टांगून आणली गेली. दहशतवादी आणि त्यांची मदत करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.