उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 07:52 IST2025-04-25T07:00:59+5:302025-04-25T07:52:07+5:30

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर बिहारमधील सभेत प्रथमच जाहीर वक्तव्य, कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देऊ

Pahalgam Terror Attack: This is the time to completely destroy the remaining existence; PM Narendra Modi determination | उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार

उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार

विभाष झा

मधुबनी : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणारे व हा कट रचणाऱ्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांना देऊ, असा कठोर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिला. हे शत्रू केवळ निःशस्त्र पर्यटकांवर हल्ला करून थांबले नाहीत तर त्यांनी भारताच्या आत्म्यावरच आघात केला असल्याचे मोदी म्हणाले.

पहलगाम हल्ल्याचा जगभरातील बहुतांश देशांनी निषेध केला आहे. त्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर एखाद्या कार्यक्रमात प्रथमच जाहीर वक्तव्य केले. राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने बिहारमधील मधुबनी येथे आयोजित एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्रजीमध्ये काही काळ भाषण केले. ते म्हणाले की, देशात दहशतवाद्यांचे उरलेसुरले अस्तित्व पूर्णपणे उद्धवस्त  करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक दहशतवादी व त्याच्या पाठीराख्यांना आम्ही शोधून काढू व त्यांच्यावर कठोर कारवाई करू. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ते दडून बसले असतील तरी त्यांना हुडकून काढू. भारत दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही, दहशतवाद्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही, असे मोदी यांनी ठामपणे सांगितले. 

‘कारगिल ते कन्याकुमारी अवघा देश शोकमग्न‘

पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्यांना मोदी व सभेला उपस्थित असलेल्या लोकांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर पंतप्रधानांनी आपले भाषण सुरू केले. पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता मोदी यांनी सांगितले की, जे दहशतवादी हल्ल्यात सामील होते व ज्यांनी हा कट रचला, त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल. या भीषण हत्याकांडात लोकांनी आपले पुत्र, कन्या, भाऊ, पती, पत्नी आदींना गमावले आहे. मृतांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, बिहार आदी राज्यांतील रहिवासी आहेत. कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत सारा देश शोकाकुल आहे.

युद्धनौकेवरून मारा, क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय नौदलाच्या आयएनएस या युद्धनौकेवरून भूपृष्ठावरून हवेत मध्यम पल्ल्यापर्यंत मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी गुरुवारी करण्यात आली. ते क्षेपणास्त्र ७० किमीपर्यंत मारा करू शकते, असे सांगण्यात आले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पावले उचलल्यावर पाकिस्तानने भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याचे जाहीर करून एक प्रकारे इशारा दिला होता; पण तिथेही भारताने पाकिस्तानवर मात केली आहे. भारतीय नौदलाच्या सूत्रांनी सांगितले की, आयएनएस सूरत या युद्धनौकेने क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. त्यामुळे नौदलाचे सामर्थ्य वाढण्यास मदतच होणार आहे. शस्त्रास्त्रे तसेच अन्य संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात भारताने आत्मनिर्भर होण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ही चाचणी त्यादृष्टीनेही महत्त्वाची आहे.

 

Web Title: Pahalgam Terror Attack: This is the time to completely destroy the remaining existence; PM Narendra Modi determination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.