पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 20:09 IST2025-04-25T20:08:15+5:302025-04-25T20:09:53+5:30
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या शोधासाठी राज्यभर शोध मोहीम राबवली जात आहे.

पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
Pahalgam Terror Attack :जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक पोलिस आणि सुरक्षा दलांकडून आरोपींच्या शोधासाठी राज्यभर शोध मोहीम राबवण्यात येत आहे. अशातच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोप्रकरणी गंदरबल जिल्ह्यातील पोलिसांनी कारवाई केली असून, संशयित खेचर मालकाला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने धर्म विचारल्याचा दावा एका महिला पर्यटकाने केला आहे. त्या महिलेचेच्या दाव्यानंतर पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेतले.
संशयिताची चौकशी सुरू
गंदरबल पोलिसांनी या प्रकरणाचा जलद तपास केला आणि संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताचे नाव अयाज अहमद जंगल असे झाली असून, तो गोहीपोरा राजन, गंदरबल येथील रहिवासी आहे. हा संशयित सोनमर्गमधील थजवास ग्लेशियरजवळ खेचर चालक म्हणून काम करतो. पोलिसांनी संशयिताची कसून चौकशी केली असून, या प्रकरणात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Eerie survivor account from #pahalgamattack site
— Nabila Jamal (@nabilajamal_) April 25, 2025
UP woman who narrowly escaped the carnage recalls how a local pony handler's strange tone and behaviour unsettled her. Trusting her instincts, she and her friends called off their ride to the upper meadows, minutes before the… pic.twitter.com/D732aNtHtN
काय आहे महिलेचा दावा?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहलगाम येथे आलेल्या एका महिला पर्यटकाने दावा केला आहे की, 20 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याच्या काही काळापूर्वी ती बैसरन व्हॅलीला पाहण्यासाठी आली होती. त्यावेळी तेव्हा फोटोत दिसणाऱ्या संशयिताने तिला त्याच्या खेचरावर बसवले आणि परिसरात फेरफटका मारुन आणला. यावेळी त्याने महिलेला अनेक विचित्र प्रश्न विचारले, ज्यात तिचा धर्म, धार्मिक स्थळांना भेट देणे आणि तिच्या मित्रांच्या धार्मिक ओळखीशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता.
महिला पर्यटकाने असाही दावा केला की, जेव्हा तो तिला खेचरावर बसून फिरवत होता, तेव्हा त्या संशयिताच्या फोनवर एक कॉल आला. यावेळी तो प्लॅन ए आणि प्लॅन बी सारख्या सांकेतिक भाषेत बोलत होता. आता या दाव्यात किती तथ्य आहे, हे तपासात समोर येईलच. महिलेचा दावा खरा ठरला, तर सुरक्षा दलांसाठी हे खूप मोठे यश असेल.