मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:42 IST2025-04-27T14:41:57+5:302025-04-27T14:42:21+5:30
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने व्हिसावर भारतात आलेल्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकांना परतण्याचे आदेश दिले आहेत.

मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. सरकारच्या आदेशानंतर पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्याचे काम वेगाने सुरू आहे. देशातील विविध राज्यांमध्ये वास्तव्यास/ तात्पुरत्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानींपैकी काही परतले आहेत, तर काही अजूनही सीमेवर परतण्याची वाट पाहत आहेत.
आतापर्यंत किती नागरिक परतले ?
भारताच्या कडक भूमिकेनंतर आता पाकिस्तानात असलेले भारतीयही पाकिस्तानातून मायदेशात परतत आहेत. गेल्या तीन दिवसांत अटारी-वाघा सीमेवरुन 450 हून अधिक भारतीय आपल्या मायदेशी परतले आहेत. तर, अटारी सीमेवर पाकिस्तानात परतणाऱ्या लोकांची मोठी गर्दी आहे. सरकारचा अल्टिमेटम संपण्यापूर्वी प्रत्येक पाकिस्तानी नागरिक आपल्या देशात परतण्यासाठी मिळेल त्या वाहनाने सीमेकडे जात आहे.
आज शेवटचा दिवस
भारत सरकारच्या आदेशानुसार, व्हिसावर येथे आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात परतण्यासाठी आज(27 एप्रिल) शेवटचा दिवस आहे. ही मुदती लक्षात घेऊन राज्य सरकारे त्यांच्या भागात असलेल्या पाकिस्तानी लोकांचा शोध घेत आहेत अन् त्यांना परत पाठवत आहेत. दिल्ली, मुंबई, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
मुदत संपल्यानंतर कारवाई होणार
भारत सरकारची अंतिम मुदत संपल्यानंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांचे वास्तव्य बेकायदेशीर मानले जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.