Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. एकीकडे, सरकार या ऑपरेशनच्या यशाबद्दल देशात आणि परदेशात मोहीम राबवत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) या कारवाईचा हिशेब मागत आहेत. अशातच भाजप नेत्याने राहुल गांधींची तुलना चक्क मीर जाफरशी केली आहे.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी एका एक्स पोस्टमध्ये म्हटले की, राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले नाही, त्याऐवजी वारंवार 'किती विमाने गमावली' असा प्रश्न विचारत आहेत. डीजीएमओच्या ब्रीफिंगमध्ये आधीच याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
या संघर्षादरम्यान किती पाकिस्तानी विमाने पाडली किंवा नष्ट केली, हे शोधण्याचा राहुल गांधींनी एकदाही प्रयत्न केला नाही. राहुल गांधींना पुढे काय मिळणार? निशाण-ए-पाकिस्तान? या पोस्टसोबत मालवीय यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अर्धा चेहरा आणि राहुल गांधींचा अर्धा चेहरा दिसत आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये ते म्हणतात की, राहुल गांधी हे नव्या युगाचे मीर जाफर आहेत, अशी बोरची टीकाही अमित मालवीय यांनी केली.