पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 14:58 IST2025-04-28T14:17:29+5:302025-04-28T14:58:07+5:30

Pahalgam Terror Attack: आज जम्मू-काश्मीर विधानसभेत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविरोधात प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला पाठिंबा देताना जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भावूक झाले. यावेळी त्यांनी  या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव घेतलं. तसेच मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत, असे ते म्हणाले

Pahalgam Terror Attack: Omar Abdullah expressed his anger in the Kashmir Assembly regarding the attack in Pahalga, saying, "After 26 years..." | पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 

पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आज जम्मू-काश्मीर विधानसभेत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविरोधात प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला पाठिंबा देताना जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भावूक झाले. यावेळी त्यांनी  या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव घेतलं. तसेच मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत, असे ते म्हणाले.

जम्मू काश्मीर विधानसभेतील विशेष अधिवेशनाला संबोधित करताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आम्ही या सभागृहात भेटलो होतो, तेव्हा अर्थसंकल्पासह काही इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली होती. तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होऊन आपण पुन्हा या वातावरणात पुन्हा भेटू असं कुणालाही वाटलं नव्हतं. पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा मंत्र्यांची बैठक घेतली तेव्हा उपराज्यापालांना विनंती करून एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या हल्ल्याने आम्हाला अंत:करणापासून हादरवून टाकलं आहे. मी त्या नौदल अधिकाऱ्याच्या विधवा पत्नीला काय उत्तर देऊ, आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहणाऱ्या त्या मुलाला काय उत्तर देऊ, असा प्रश्न मला पडला आहे.

ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, मागच्या २६ वर्षांमध्ये पहिल्यांदा जम्मू काश्मीरमधील लोकांना कुठल्याही हल्ल्यानंतर अशा प्रकारे घराबाहेर पडताना पाहिले आहे. कथुआपासून श्रीनगरपर्यंत लोक घराबाहेर आले आणि त्यांनी काश्मिरींना असे हल्ले नको आहेत, असे सांगितले. हे माझे शब्द नाही आहेत तर हे प्रत्येक काश्मिरी नागरिकाचे शब्द आहेत. या देशातील कुठल्याही विधानसभा किंवा संसदेपेक्षा जम्मू काश्मीर विधानसभा पहलगाममध्ये झालेल्या २६ लोकांच्या मृत्यूचं दु:ख अधिक समजते. तुमच्यासमोर ते लोक आहेत. ज्यांच्यापैकी कुणी आपले जवळचे नातेवाईक गमावले आहेत. तर कुणी आपले वडील, कुणी आपले काका गमावले आहेत. आपल्यापैकी अनेक सहकारी असे आहेत ज्यांच्यावर हल्ले झालेले आहेत. २००१ च्या ऑक्टोबर महिन्यात श्रीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या लोकांचं दु:ख या विधानसभेपेक्षा अधिक कुणाला समजू शकत नाही, अशा शब्दात ओमर अब्दुल्ला यांनी आपली भावना व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, भूतकाळात आम्ही काश्मिरी पंडित आणि शिखांवर दहशतवादी हल्ले होताना पाहिले आहेत. आता  दीर्घकाळानंतर असा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामधील पीडितांच्या कुटुंबीयांची माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रभारी नाही. मात्र मी पर्यटकांना काश्मिरमध्ये येण्यासाठी निमंत्रित केलं आहे. एक यजमान म्हणून त्यांची देखभाल करणं आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. या पर्यटकांची माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत, असेही ओमर अब्दुल्ला म्हणाले.  

Web Title: Pahalgam Terror Attack: Omar Abdullah expressed his anger in the Kashmir Assembly regarding the attack in Pahalga, saying, "After 26 years..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.