पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात हरियाणाचे विनय नरवाल याचाही मृत्यू झाला आहे. २६ वर्षीय विनय नेव्हीमध्ये अधिकारी होता. ८ दिवसांपूर्वी त्याचं हिमांशीशी लग्न झालं होतं. याच दरम्यान, विनयच्या लग्नाचा व्हिडीओही आता व्हायरल होत आहे. विनयचं १६ एप्रिल रोजी लग्न झालं होतं आणि त्यानंतर तो हनीमूनसाठी पहलगामला गेला होता. मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला आहे.
आईवडिलांचा एकुलता एक मुलगा
हरियाणा सीएम नायब सिंह सैनी यांनी व्हिडीओ कॉलवर विनयचे आजोबा हवा सिंह नरवाल यांच्याशी बोलून त्यांचं सांत्वन केलं आहे. विनय त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. विनयच्या आजोबांनी पत्रकारांना सांगितलं की, "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण त्याला व्हिसा मिळाला नाही आणि म्हणूनच तो काश्मीरला गेला."
"मोदींना दहशतवाद संपवण्याचं आवाहन"
आजोबांनी पंतप्रधान मोदींना दहशतवाद संपवण्याचं आवाहन केलं. मूळचा हरियाणाच्या कर्नल जिल्ह्यातील रहिवासी असलेला विनय नरवाल २ वर्षांपूर्वीच नेव्हीमध्ये रुजू झाला होता. विनयला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारलं. विनयची पत्नी सुरक्षित आहे. या घटनेनंतर विनयच्या मृतदेहाजवळ बसलेल्या त्याच्या पत्नीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
"भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
कानपूरचा शुभम द्विवेदीचाही यामध्ये मृत्यू झाला. त्याचं दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. तो पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह फिरायला गेला होता. ज्या वेळी दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घातल्या, त्यावेळी त्याच्यासोबत फक्त त्याची पत्नी होती. कुटुंबातील बाकीचे सदस्य खाली होते. शुभमच्या भावाने याबाबत माहिती दिली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला.