Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 05:35 IST2025-04-24T05:35:09+5:302025-04-24T05:35:35+5:30

बैसरनमध्ये जाऊन घटनास्थळाला दिली भेट, मृतांचे नातेवाईक, तसेच जखमींची भेट घेऊन दिला धीर, दहशतवादविरोधी मोहीम अधिक तीव्र करा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे लष्कराला आदेश; उच्चस्तरीय बैठकीत घेतला आढावा

Pahalgam Terror Attack: India will not bow down, will not spare anyone; Home Minister Amit Shah warns | Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

पहलगाम : दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही. पहलगाममध्ये भेकड हल्ला करणाऱ्यांवर अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी ठामपणे सांगितले. 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यात देशातल्या विविध राज्यांतील, तर काही विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मायदेशात परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्ली विमानतळावरच प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काश्मीर स्थितीबाबत चर्चा केली.

या हल्ल्यात मरण पावलेल्यांना शाह यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मृत व जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांशी तसेच हल्ल्यातून सुदैवाने वाचलेल्या लोकांशी अमित शाह यांनी संवाद साधला. त्यांना दिलासा देताना ते म्हणाले की, हा हल्ला करणाऱ्यांचा सुरक्षा दले शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करतील. त्यानंतर जिथे हल्ला झाला, त्या बैसरन घाटी या भागाला शाह यांनी भेट देऊन तिथे पाहणी केली.  गृहमंत्री शाह यांनी जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक नलीन प्रभात यांच्याकडून स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी एका बैठकीत लष्करप्रमुख व नायब राज्यपाल यांच्याशी जम्मू- काश्मीरमधील स्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांच्यासोबत नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला उपस्थित होते. हल्ल्यानंतर सौदी अरेबियाचा दोन दिवसांचा दौरा अर्धवट सोडून भारतात परत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळावरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासमवेत बैठक घेतली.

एनआयए काश्मीरमध्ये; ३ हल्लेखोरांची रेखाचित्रे जारी
पोलिस महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले. त्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. हल्ल्यातील पाच दहशतवाद्यांपैकी तिघांची रेखाचित्रे बुधवारी जारी केली. आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी त्यांची नावे असून ते पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या वर्णनानुसार या हल्लेखोरांची रेखाचित्रे तयार करण्यात आली. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना टीआरएफ स्वीकारली आहे.

विशेष विमानाने आज पर्यटकांना आणणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यास सांगितल्यानंतर, २४  एप्रिल रोजी श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असून, इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील ८३ प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. उद्यासाठीच आणखी एका विमानाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असून, त्यासाठीच्या प्रवाशांची यादीसुद्धा तयार होते आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली. 

Web Title: Pahalgam Terror Attack: India will not bow down, will not spare anyone; Home Minister Amit Shah warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.