पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 19:38 IST2025-04-28T19:36:32+5:302025-04-28T19:38:08+5:30
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. कुठल्याही पर्वतांवर किंवा इतरत्र ट्रेकिंगसाठी न जाता फक्त फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हा आदेश संपूर्ण जम्मू-काश्मीरसाठी लागू असल्याचे एका स्थानिक अधिकाऱ्याने मीडियाला सांगितले आहे.
दहशतवाद्यांना शोधासाठी ऑपरेशन सुरू...
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या वरच्या भागात, तसेच जंगलात पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांकडून राबविण्यात येत असलेले कोम्बिंग ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत राज्यात येणाऱ्या पर्यटकांना आणि गिर्यारोहकांना ट्रेकिंगसाठी वरच्या भागात आणि जंगलात जाऊ नये, तर फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच सहलीचा आनंद घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.
राज्यात तणावाचे वातावरण
गेल्या सोमवारी(22 एप्रिल) पहलगामपासून 5 किमी अंतरावर असलेल्या बैसरन येथे दहशतवाद्यांनी नि:शस्त्र पर्यटकांवर अंदाधूंद गोळीबार केला होता, ज्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच, या घटनेत 22 पर्यटक जखमीही झाले. या घटनेनंतर राज्यातील बहुतांश पर्यटक तात्काळ माघारी निघाले. पण, आता हळूहळू पर्यटक पुन्हा येऊ लागले आहेत.