पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. याच दरम्यान पाकिस्तानची रहिवासी असलेल्या मीनल खान हिची भावुक गोष्ट समोर आली आहे, मीनल काही महिन्यांपूर्वीच जम्मूतील घरोटा येथील सीआरपीएफ जवान मुनीर खानशी ऑनलाईन निकाह करून भारतात आली होती.
मीनल खान म्हणते की, तिला ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा व्हिसा मिळाला. तिने एलटीव्ही (लाँग टर्म व्हिसा) आवश्यक प्रक्रिया देखील पूर्ण केली होती, परंतु सरकारच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे तिचे भविष्य आता धोक्यात आहे.
भारत सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानला परतताना वाघा बॉर्डरवर मीनल खान भावुक झाली. एएनआयशी बोलताना ती म्हणाली, "यात आमचा काहीच दोष नाही. माझा शॉर्ट टर्म व्हिसा ९ वर्षांनी जारी करण्यात आला आहे. मी एलटीव्हीसाठी सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन केलं. आता अचानक सर्व काही रद्द करण्यात आलं आहे आणि आम्हाला परत जाण्यास सांगण्यात आलं. आम्हाला आमच्या कुटुंबांसोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी."
मीनलने पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला. "निरपराध लोकांच्या या क्रूर हत्येचा आम्ही निषेध करतो. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण इतर कुटुंबांना याचा त्रास सहन करावा लागू नये" असंही म्हटलं आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक शक्यताही व्यक्त केल्या जात आहे. एका पाकिस्तानी महिलेने भारतीय जवानाशी ऑनलाइन निकाह कसा केला? असा प्रश्न विचारला जात आहे.
काही युजर्सनी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जम्मूतील घरोटा भागातील रहिवासी मुनीर खान सीआरपीएफमध्ये आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी व्यक्तीशी झालेल्या निकाहाबद्दल सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.