कचऱ्याची गाडी, हातात झाडू... लोकांनी म्हटलं वेडं; माजी IPS इंद्रजीत सिद्धू यांना पद्मश्री पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 16:15 IST2026-01-26T16:14:28+5:302026-01-26T16:15:17+5:30
Inderjeet Singh Sidhu : ८८ वर्षांचे इंद्रजीत सिंग सिद्धू निवृत्तीनंतर अनेक वर्षे समाजसेवेत कार्यरत आहेत. चंदीगडचे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी आणि 'सुंदर शहर' हा टॅग जपण्यासाठी त्यांनी स्वतः हातात झाडू घेतला आहे.

कचऱ्याची गाडी, हातात झाडू... लोकांनी म्हटलं वेडं; माजी IPS इंद्रजीत सिद्धू यांना पद्मश्री पुरस्कार
माजी आयपीएस (IPS) अधिकारी इंद्रजीत सिंग सिद्धू यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ८८ वर्षांचे इंद्रजीत सिंग सिद्धू निवृत्तीनंतर अनेक वर्षे समाजसेवेत कार्यरत आहेत. चंदीगडचे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी आणि 'सुंदर शहर' हा टॅग जपण्यासाठी त्यांनी स्वतः हातात झाडू घेतला आहे. १९९६ मध्ये ते पंजाब पोलीस दलातून उपमहानिरीक्षक (DIG) पदावरून निवृत्त झाले.
निवृत्तीच्या तीन दशकांनंतरही ते चंदीगडच्या सेक्टर ४९ मधील आपल्या परिसराची स्वच्छता करत आहे. दररोज सकाळी सहा वाजता ते रस्त्यावरील कचरा गोळा करण्यासाठी बाहेर पडतात. आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या सोसायटीत राहणाऱ्या सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून त्यांनी हे स्वतः करण्याचं ठरवलं. स्वच्छता करण्यात कोणतीही लाज नाही असं ते म्हणतात.
सिद्धू यांनी कचरा गोळा करण्यासाठी आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी बॅग किंवा रिक्षाचा वापर करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हा त्यांचा एकट्याचा प्रयत्न होता. काही लोकांनी त्यांना 'वेडं' देखील म्हटलं, पण हळूहळू त्याचे रूपांतर एका चळवळीत झालं. सिद्धू यांचे कुटुंब आणि सहकारी रहिवासी आता त्यांच्या कामात त्यांना पाठिंबा देतात. 'स्वच्छ भारत सर्वेक्षण'मध्ये चंदीगडने प्रथम क्रमांक मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं पाहिजे असे सिद्धू म्हणतात.
जर तुम्ही परदेशात गेलात तर तिथले रस्ते अगदी स्वच्छ असतात. आपले रस्ते तसे का असू शकत नाहीत? असा सवाल त्यांनी विचारला आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून आपण समाजात मोठं योगदान देत आहोत असं सिद्धू यांना वाटत नाही, परंतु यामुळे आपल्याला खोलवर समाधान मिळते, असं त्यांनी सांगितलं. "मला स्वच्छ जागा आवडते, म्हणून मी साफसफाई करतो. जोपर्यंत मला शक्य आहे, तोपर्यंत मी हे काम करत राहीन" असंही म्हटलं आहे. इंद्रजीत सिंग सिद्धू गेल्या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लोक त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत.