पॅकेजमुळे वाढलेल्या महागाईने पराभव
By Admin | Updated: March 8, 2015 23:06 IST2015-03-08T23:06:33+5:302015-03-08T23:06:33+5:30
तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने २००९ ते ११ या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणलेले विविध आर्थिक पॅकेज

पॅकेजमुळे वाढलेल्या महागाईने पराभव
नवी दिल्ली : तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने २००९ ते ११ या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणलेले विविध आर्थिक पॅकेज कारणीभूत ठरले. वित्तीय आणि महसुली तूट भरून काढण्यासाठी पॅकेजचा डोस देण्यात आला; मात्र त्याची परिणती महागाई वाढण्यात झाली, त्यामुळेच जनतेने सरकारला धडा शिकविला असे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले. उपरोक्त काळात प्रणव मुखर्जी हे अर्थमंत्री होते. हा सरकारचा सामूहिक निर्णय होता, असे सांगत चिदंबरम यांनी मुखर्जींच्या नावाचा थेट उल्लेख टाळला.
मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना चेन्नईच्या लोयाला इन्स्टिट्यूट आॅफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (लिबा) येथे ते बोलत होते. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पाने समानता, आर्थिक स्थैर्याची कसोटी उत्तीर्ण केलेली नाही. त्यात काही बाबी चांगल्या असल्या तरी असमानता वाढीस लागणार आहे.
मुखर्जी अर्थमंत्री असताना २००८ मध्ये आर्थिक आघाडीवर बिकट परिस्थिती उभी ठाकल्याने सरकारने विविध पॅकेजची घोषणा केली होती. चिदंबरम यांनी आर्थिक पॅकेजची परिणती महागाईत भरमसाठ वाढ होण्यात झाली. त्यानंतर निवडणुकीत जनतेने संपुआ सरकारला शिक्षा ठोठावली असे स्पष्ट केले. आर्थिक तूट तीन टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य जेटलींनी आणखी वर्ष म्हणजे २०१७-१८ पुढे ढकलले आहे. संपुआ सरकारने २०१५-१६ या वर्षासाठी आर्थिक तुटीचे लक्ष्य ३.६ टक्के निश्चित केले असताना या सरकारने ते ३.९ टक्के निश्चित केले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)