नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये लाखो पदं रिक्त आहेत. यासंदर्भात खुद्द केंद्र सरकारनं राज्यसभेत माहिती दिली आहे. सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये 1 लाखाहून अधिक पदं रिक्त असल्याचं बुधवारी राज्यसभेत सांगण्यात आलं. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबरपर्यंत सीएपीएफ आणि आसाम रायफल्सची एकूण तैनाती संख्या 9,48,204 होती.
रिक्त पदं तातडीनं भरण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे,असं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात नित्यानंद राय म्हणाले की, गेल्या 5 वर्षांत सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये 71,231 नवीन पदं भरण्यात आली आहेत. सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील रिक्त पदं ही सेवानिवृत्ती, राजीनामा, पदोन्नती, मृत्यू, नवीन बटालियनची स्थापना, नवीन पदांची निर्मिती इत्यादी कारणांमुळे आहेत. ती भरणं ही निरंतर प्रक्रिया आहे.
आकडेवारीवरून असे दिसून आले की, 30 ऑक्टोबरपर्यंत 1,00,204 पदं रिक्त आहेत, ज्यात सीएपीएफमध्ये 33,730, सीआयएसएफमध्ये 31,782, बीएसएफमध्ये 12,808, आयटीबीपीमध्ये 9,861, एसएसबीमध्ये 8,646 आणि आसाम रायफल्समध्ये 33,730 पदं आहेत. दरम्यान, मंत्री नित्यानंद राय म्हणाले, यूपीएससी, एसएससी आणि संबंधित दलांद्वारे पदे त्वरीत भरण्यासाठी मंत्रालय गंभीर पावलं उचलत आहे. तसेच, भरतीला गती देण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी लागणारा वेळ कमी करणं, कॉन्स्टेबल-जीडीसाठी उमेदवारांच्या शॉर्टलिस्टसाठी कट-ऑफ गुण कमी करणं, जेणेकरुन पुरेसे उमेदवार निवडले जातील, अशी अनेक पावलं सरकारनं उचलली आहेत.
याचबरोबर, सरकारनं सीपीएएफ कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाला महत्त्व दिल्याचं मंत्री नित्यानंद राय यांनी एका वेगळ्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ते म्हणाले, या उद्देशाने सीपीएएफ कर्मचाऱ्यांनी त्यांचं जीवन संतुलन सुधारण्यासाठी वर्षातील 100 दिवस त्यांच्या कुटुंबियांसोबत घालवावेत, यासाठी मंत्रालयानं सतत प्रयत्न केले आहेत. दरम्यान, नित्यानंद राय यांनी दिलेल्या आकडेवरीवरून असे दिसून आले आहे की, 2020 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान, 42,797 सीएपीएफ आणि आसाम रायफल्स कर्मचाऱ्यांनी एका वर्षात 100 दिवसांची रजा घेतली आहे.