बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 22:18 IST2025-12-23T21:42:35+5:302025-12-23T22:18:45+5:30
Protest Against Bangladesh: बांगलादेशमध्ये हिंदू तरुण दीपू चंद्र दास याच्या करण्यात आलेल्या निर्घृण हत्येचे पडसात भारतात तीव्रपणे उमटताना दिसत आहेत. देशातील विविध भागात यावरून आंदोलनं होत आहेत. दरम्यान, आज मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा देशातील प्रमुख शहरांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केले.

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
बांगलादेशमध्ये हिंदू तरुण दीपू चंद्र दास याच्या करण्यात आलेल्या निर्घृण हत्येचे पडसात भारतात तीव्रपणे उमटताना दिसत आहेत. देशातील विविध भागात यावरून आंदोलनं होत आहेत. दरम्यान, आज मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा देशातील प्रमुख शहरांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादम्यान, काही ठिकाणी बांगलादेशच्या उच्चायोगाला घेरावण घालण्याचा प्रयत्न झाला. तर काही ठिकाणी बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे पुतळे जाळले गेले. या आंदोलनांमुळे दिल्ली आणि कोलकात्यामध्ये परिस्थिती एवढी तणावपूर्ण बनली की, ज्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली.
मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे काही संघटनांनी तीव्र आंदोलन केले. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने काही काळ वाहतुकीतही अडथळा निर्माण झाला होता. यावेळी आंदोलकांनी बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारचा पुतळा जाळला. तसेच बांगलादेशविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारवाई करावी, अशी मागणी केली.
तिकडे दिल्लीमध्ये बांगलादेशच्या हाय कमिशनजवळ तीव्र आंदोलनामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. हातात भगवा झेंडा आणि बॅनर घेतलेले शेकडो आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांसोबत धक्काबुक्कीही झाली. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
कोलकात्यामध्येही बांगलादेशच्या हाय कमिशनच्या दिशेने मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी बेकरबागान परिसरात रोखले. जेव्हा आंदोलक बॅरिकेड्स तोडून पुढे जाऊ लागले, तेव्हा पोलिसांना लाठीमार करावा लागला. या झटापटीमध्ये अनेक आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी सुमारे १२ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.