भाजपशी लढण्यासाठी विरोधी पक्ष पूर्ण सज्ज: नितीशकुमार; ‘ते’ केवळ प्रचार करतात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 07:14 IST2023-04-15T07:14:28+5:302023-04-15T07:14:46+5:30
देशाची राजधानी दिल्लीतून परतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात उत्साह संचारला आहे.

भाजपशी लढण्यासाठी विरोधी पक्ष पूर्ण सज्ज: नितीशकुमार; ‘ते’ केवळ प्रचार करतात!
एस. पी. सिन्हा
पाटणा :
देशाची राजधानी दिल्लीतून परतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात उत्साह संचारला आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचे नेते सहमत आहेत. विरोधी पक्षांचे नेते एकत्र आल्यास सर्व काही निश्चित होईल. त्यानंतर मी संपूर्ण देशाचा दौरा करेन, असे नितीशकुमार यांनी जाहीर केले आहे. यावेळी देश का नेता कैसा हो, नितीशकुमार जैसा हो, अशा घोषणाही उपस्थितांनी दिल्या.
नितीशकुमार म्हणाले की, सध्या दिल्लीत ज्यांचे राज्य आहे, ते काही काम करतात का? ते केवळ प्रचार करीत आहेत. ते इतिहास बदलण्यात मग्न आहेत. जुन्या गोष्टी संपवत चालले आहेत. त्यांना देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईशी काही देणे-घेणे होते का? काहीही नाही.
विरोधकांना भाजप त्रस्त करीत आहेत. विविध राज्यांत लोकांना त्रास देत आहेत. भाजपला मते देऊ नयेत. लोकांनी भाजपला मते दिल्यास त्यांचा नाश होईल व भाजप विरोधात मते दिल्यास मतदारांच्या, राज्याच्या व देशाच्या विकासात योगदान होईल.
भारतीयांत फूट पाडणारे खरे ‘राष्ट्रद्रोही’ : सोनिया
आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरकारवर हल्ला चढवताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी केंद्रावर आरोप केला की, सत्ताधारी घटनात्मक संस्थांचा दुरूपयोग व विध्वंस करत असून, जनतेने या गोष्टींचा निषेध करून या ‘पद्धतशीर हल्ल्या’पासून संविधानाचे रक्षण केले पाहिजे.
n आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त टेलिग्राफमध्ये लेख लिहून गांधी म्हणाल्या की, आज खरे ‘देशद्रोही’ तेच आहेत जे आपल्या शक्तीचा गैरवापर करून धर्माच्या आधारावर भारतीयांत फूट पाडत आहेत.