पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने या हल्ल्यामागे हात असलेल्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर राबवत जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. या कारवाईदरम्यान, भारतीय सैन्यदलांनी सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले होते. तसेच या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सैन्यदलांनी केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या काही हवाई तळांना लक्ष्य करत मोठं नुकसान केलं होतं. मात्र दोन्ही देशांमधील संघर्ष अगदी टीपेला पोहोचला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा केली होती. मात्र भारताने दोन्ही देशांच्या सैन्यदलांच्या डीजीएमओंनी युद्धविरामावर सहमती दर्शवल्याचे सांगितले होते. तरीही भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी अमेरिकेत गेलेल्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर युद्धविराम कुणी केला, याबाबत मोठं विधान केलं आहे.
याबाबत एस. जयशंकर म्हणाले की, त्यावेळी जे काही घडले, त्याच्या नोंदी अगदी सुस्पष्ट आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षविराम हा दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये झालेल्या चर्चेनंतर करण्यात आला होता. यावेळी अमेरिकेने व्यापाराचा हवाला देऊन दोन्ही देशांमधील संघर्ष थांबवल्याचा ट्रम्प यांनी केलेला दावाही एस. जयशंकर यांनी फेटाळून लावला.
जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाची घोषणा केली, तेव्हा तुम्हाला काय वाटलं. त्यावेळी पीएमओमध्ये काय वातावरण होतं. असं विचारलं असता, जयशंकर म्हणाले की, त्यावेळी काय घडलं याच्या नोंदी खूप स्पष्ट आहेत. हा युद्धविराम दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी निश्चित केला होता. त्यामुळे मी हा मुद्दा इथेच संपवतो. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये भारत आणि अमेरिका हेच मध्यवर्ती आहेत. आमचा देश एक मोठा देश आहे. जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आमचा समावेश होतो. आमची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आमचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारतानाही आपल्यामध्ये आत्मविश्वास दिसला पाहिजे, असे जयशंकर यांनी पुढे सांगितले.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धविरामावर १८ जून रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून झालेल्या संभाषणावेळीही जोरदार चर्चा झाली होती, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले होते.