"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 19:53 IST2025-05-07T19:52:55+5:302025-05-07T19:53:55+5:30
Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लष्कराने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्ही मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी निरपराध लोकांचे बळी धेतले होते, असं विधान राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.

"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताच्या संरक्षण दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत प्रथमच जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लष्कराने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्ही मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी निरपराध लोकांचे बळी धेतले होते, असं विधान राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.
आज सहा राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५० बीआरओ यांच्या पायाभरणीच्या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी राजनाथ सिंह यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, तुम्हाला माहितीच असेल की, काल रात्री भारताच्या सशस्त्र सैन्य दलांनी आपलं शौर्य आणि पराक्रमाचा परिचय देताना एक नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय लष्कराने अचुकता, सतर्कता आणि संवेदशीलतेचा परिचय देत लक्ष्य उद्ध्वस्त केलं. भारतीय लष्कराने कुठल्याही रहिवासी भागाला लक्ष्य केलं नाही.
राजनाथ सिंह यांनी पुढे सांगितले की, ऑपरेशन सिंधूरसाठी मी आमच्या सैन्यदलातील जवान आणि अधिकाऱ्यांना संपूर्ण देशाच्यावतीने धन्यवाद देतो. तसेच लष्कराला संपूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानतो. आम्ही ही कारवाई करताना जिन मोहि मारा, तिन मोहि मारे या मारुतीरायाच्या आदर्शाचं पालन केलं. आम्ही केवळ आमच्या निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्यांनाच मारले, असेही राजनाथ सिंह म्हणाले.