तत्त्वनिष्ठा, तंत्रज्ञानाच्या ताकदीच्या जोरावर यशस्वी झाले ऑपरेशन सिंदूर: लष्करप्रमुख जनरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 13:40 IST2025-11-02T13:39:01+5:302025-11-02T13:40:52+5:30
पाकिस्तानच्या निष्पाप नागरिकांवर हल्ला नाही, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

तत्त्वनिष्ठा, तंत्रज्ञानाच्या ताकदीच्या जोरावर यशस्वी झाले ऑपरेशन सिंदूर: लष्करप्रमुख जनरल
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने तत्त्वनिष्ठा आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्त बळावर लढा देऊन यश मिळविले, असे प्रतिपादन भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी केले. या मोहिमेदरम्यान भारताने पाकिस्तानातील निष्पाप नागरिक आणि लष्करी ठिकाणांवर कोणताही हल्ला केला नाही, असेही जनरल द्विवेदी यांनी सांगितले.
मध्य प्रदेशातील रीवा येथे पत्रकारांशी बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले की, भारताने फक्त दहशतवादी पायाभूत सुविधा आणि त्यांचे तळ नष्ट केले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील भागात असलेल्या दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सैन्याने हल्ले केले. त्यामुळे चार दिवस संघर्ष झाला. १० मे रोजी लष्करी कारवाया थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रनिर्माण ध्येय जनरल द्विवेदी म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले; कारण आम्ही तत्त्वनिष्ठा आणि तंत्रज्ञानाच्या संयुक्त शक्तीने लढलो. आम्ही काळजी
घेतली की पाकिस्तानातील कोणताही निरपराध नागरिक बाधित होऊ नये. आमचे लक्ष्य केवळ दहशतवादी आणि त्यांचे नेतृत्व होते.’ ते पुढे म्हणाले, ‘सर्व नागरिकांनी २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ या ध्येयासाठी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी व्हावे.’
केवळ दहशतवादी ठिकाणांवरच कारवाई
आपली जुनी शाळा ‘रीवा सैनिक विद्यालया’लाही यावेळी जनरल द्विवेदी यांनी भेट दिली. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान प्रार्थना किंवा नमाज सुरू असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आम्ही केवळ दहशतवादी असलेल्या ठिकाणांवरच कारवाई केली. निरपराध लोकांवर किंवा लष्करी तळांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आम्ही पाकिस्तानला संदेश दिला की, आम्ही त्यांच्यासारखे नाही आहोत.