Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 08:49 IST2025-05-21T08:48:30+5:302025-05-21T08:49:37+5:30
Operation Sindoor : अमृतसरमधील सुवर्ण मंदिर संकुलात हवाई संरक्षण तोफा बसवण्याचा लष्कराचा दावा वादाचा विषय बनला.

Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू होता. या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण मंदिरामध्ये एअर डिफेन्स गन बसवण्याच्या लष्कराच्या दाव्यावर, लष्कराने मंगळवारी स्पष्टीकरण दिले. सुवर्ण मंदिरात कोणत्याही एअर डिफेन्स गन तैनात केलेल्या नाहीत. कॅम्पसमध्ये गन तैनात असल्याबाबत काही माध्यमांमध्ये वृत्ते प्रसारित केली जात आहेत, ती निराधार असल्याचे लष्कराने सांगितले.
श्री हरिमंदिर साहिबचे अतिरिक्त मुख्य ग्रंथी ज्ञानी अमरजित सिंह यांच्या प्रतिक्रियेनंतर लष्कराचे हे विधान आले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, लष्कराला परिसरात हवाई संरक्षण तोफा बसवण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. मुख्य ग्रंथी ज्ञानी रघबीर सिंग यांनी असेही म्हटले होते की, ज्यावेळी लष्करी कारवाई सुरू होती तेव्हा ते परदेश दौऱ्यावर होते पण त्यावेळी त्यांच्याशी हवाई संरक्षण तोफा बसवण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती.
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
सुवर्ण मंदिर संकुलात मुख्य ग्रंथीच्या परवानगीने हवाई संरक्षण तोफा बसवण्यात आल्या होत्या, असा दावा भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल सुमेर इवान यांनी एक दिवस आधी केला होता. यासंदर्भात मंगळवारी अतिरिक्त मुख्य ग्रंथी ग्यानी अमरजित सिंग आणि मुख्य ग्रंथी ग्यानी रघबीर सिंग यांचे वक्तव्य समोर आले.
अमरजीत सिंग म्हणाले की, शहरातील ब्लॅकआउटबाबत अमृतसर जिल्हा प्रशासनाच्या अलिकडच्या सूचना लक्षात घेता, श्री हरमंदिर साहिब व्यवस्थापनाने सर्वतोपरी सहकार्य केले आहे आणि श्री हरमंदिर साहिब संकुलातील बाह्य आणि वरचे दिवे निर्धारित वेळेसाठी बंद ठेवण्यात आले होते.
कोणतीही परवानगी दिली नव्हती
एसजीपीसीचे अध्यक्ष अधिवक्ता हरजिंदर सिंग धामी म्हणाले की, ब्लॅकआउट दरम्यान दिवे बंद करण्यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधला होता, ज्यावर आम्ही प्रशासकीय जबाबदारी मानून पूर्ण सहकार्य केले होते आणि अतिरिक्त मुख्य ग्रंथी ज्ञानी अमरजीत सिंग यांच्याशी चर्चा करून, फक्त बाह्य दिवे बंद ठेवण्यात आले होते.
श्री हरमंदिर साहिब येथे हवाई संरक्षण तोफा बसवण्याबाबत भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही आणि हवाई संरक्षण तोफा बसवण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, असे त्यांनी सांगितले.