बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 00:54 IST2025-05-08T00:53:24+5:302025-05-08T00:54:10+5:30
Operation Sindoor: भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्यातील या अधिकाऱ्यांचं नाक कापलं गेलं आहे. तसेच देशासमोर त्यांची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळेच पाकिस्तानी सैन्य हा हल्ला पचवून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल असे दावे केले जात आहेत.

बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
भारतीय सैन्यदलांनी मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी अड्ड्यांचा धुव्वा उडवला. या कारवाईदरम्यान, बहावलपूरमधील मसूद अझहर याच्या अड्ड्यांना लक्ष्य करत कपण्यात आलेला हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या सर्वाधिक जिव्हारी लागला आहे. त्याचं कारण म्हणजे भारतीय सैन्याने बहावलपूरमधील ज्या भागाला लक्ष्य केलंय तो केवळ मसूद अझहरचा अड्डाच नव्हे तर पाकिस्तानी सैन्याचं माहेरघर मानला जातो. पाकिस्तानी सैन्यातील सर्वाधिक जनरल हे बहावलपूर येथूनच येतात. तसेच स्वत:ला से जगातील सर्वश्रेष्ठ सेनानी समजतात. मात्र आता भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्यातील या अधिकाऱ्यांचं नाक कापलं गेलं आहे. तसेच देशासमोर त्यांची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळेच पाकिस्तानी सैन्य हा हल्ला पचवून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल असे दावे केले जात आहेत.
भारतीय लष्कराने बहावलपूरवर हल्ला करत पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांचा इगो दुखावला आहेत. भारतीय सैन्याने आपल्या घरात हल्ला करावा, हे पाकिस्तानी अधिकार कदापिही सहन करू शकत नाहीत. त्यामुळेच ते प्रत्युत्तराचा प्रयत्न करतील, मात्र या हल्ल्याच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानी लष्कराचा मागच्या ७० वर्षांपासूनचा अहंकार दुखावला आहे, असे राजकीय विश्लेषक सी. क्रिस्टिन फेयर यांनी सांगितले.
बहावलपूर हे पाकिस्तानच्या XXXI कोअरचं मुख्यालय आहे. पाकिस्तानी सैन्यातील ही कोअर थेट जनरल हेडक्वार्टर रावळपिंडीला रिपोर्ट करते, यावरून तिचं महत्त्व आपण समजू शकतो. याच कोअरकडे भारत पाकिस्तान यांच्यातील राजस्थानला लागून असलेल्या भागातील आंतरराष्ट्रीय सीमेच्या देखभालीची जबाबदारी आहे. त्यामुळे बहावलपूरमधील हल्ला हा केवळ दहशतवाद्यांवरील हल्ला नव्हता तर तो पाकिस्तानमध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये असलेल्या साट्यालोट्याला दिलेलं प्रत्युत्तर होतं, असा दावाही काही संरक्षणतज्ज्ञांनी केला आहे.