Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 18:14 IST2025-05-07T18:13:28+5:302025-05-07T18:14:26+5:30
Operation Sindoor : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सय्यद आदिल हुसेन शाहने पर्यटकांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता.

Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह याच्या वडिलांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हवाई हल्ल्याने माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला आहे असं म्हटलं. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला.
सय्यद आदिल हुसेन शाह वडील सय्यद हैदर शाह म्हणाले, आज मला खूप आनंद झाला आहे कारण आपल्या सैन्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ लोकांच्या हत्येचा बदला घेतला आहे. आज त्या सर्व आत्म्यांना शांती मिळेल हे मला समाधान आहे. ही कारवाई योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करण्यात आली आहे. हा न्यायाचा क्षण आहे.
भाऊ सय्यद नवशादनेही आनंद व्यक्त केला. आज सकाळी जेव्हा आम्हाला कळलं की मोदीजींनी बदला घेतला, तेव्हा आम्हाला खूप समाधान वाटलं. आता माझ्या भावाच्या आणि इतर २५ निष्पाप लोकांच्या आत्म्याला शांती मिळेल. आम्हाला न्याय मिळाला आहे असं भावाने म्हटलं आहे. २२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सय्यद आदिल हुसेन शाहने पर्यटकांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता.
"आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
पाकिस्तानी दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर विनय नरवालची पत्नी हिमांशी नरवाल हिने प्रतिक्रिया दिली आहे. आज आपल्या सैन्याने आणि मोदी सरकारने दहशतवाद्यांना रोखठोक उत्तर दिलं आहे आणि हे सिद्ध केलं आहे की, आता पाकिस्तानलाही २६ भारतीय कुटुंबांना झालेल्या वेदनांची जाणीव झाली असेल असं हिमांशी नरवालने म्हटलं आहे.