शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 05:59 IST2025-07-28T05:59:05+5:302025-07-28T05:59:49+5:30
तामिळनाडू दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी काढले उद्गार; चोल साम्राज्याच्या सन्मानार्थ कार्यक्रमात सहभाग

शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
गंगईकोंडा चोलपुरम (तामिळनाडू) : मालदीव दौऱ्यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू दौऱ्यात शनिवारी रात्री त्यांनी विविध प्रकल्पांचे उद्घाटन तसेच लोकार्पण केले. रविवारी त्यांनी तिरुचिरापल्ली येथील गंगईकोंडा चोलपुरम मंदिरात चोल सम्राट राजेंद्र चोल-प्रथम यांच्या जयंतिनिमित्त आयोजित समारंभात ते सहभागी झाले. चोल सम्राट राजराज चोल आणि त्यांचे पुत्र राजेंद्र चोल-प्रथम यांचे भव्य पुतळे येथे उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.
मोदी म्हणाले, ‘सार्वभौमत्वावर हल्ला झाला तर भारत कसे प्रत्युत्तर देईल हे ऑपरेशन सिंदूरने जगाला दाखवून दिले. शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे या मोहिमेने सिद्ध केले.’ भारताने पाकिस्तानवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे नागरिकांत आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.
चोल कालीन लोकशाहीचा गौरव लोकशाहीबाबत बोलताना अनेक लोक ब्रिटनच्या मॅग्नाकार्टाचा उल्लेख करतात. परंतु, चोलकालीन ‘कुडवोलाई प्रणाली’ त्यापेक्षा जुनी १ हजार वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे या राजांचे पुतळे इतिहासात आधुनिक प्रेरणा ठरतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
गंगईकोंडा चोलपुरममध्ये केला ‘रोड शो’
प्रतिष्ठित चोल साम्राज्याचे नरेश राजेंद्र चोल-प्रथम यांच्या जयंती समारंभाच्या निमित्ताने गंगईकोंडा चोलपुरममध्ये दाखल होताच मोदी यांनी तीन किमी ‘रोड शो’ केला. आपल्या वाहनाच्या ‘रनिंग बोर्ड’वर उभे राहून त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या नागरिकांना अभिवादन केले.
पंतप्रधानांची ई.के. पलानीस्वामींनी घेतली भेट
अण्णाद्रमुकचे सरचिटणीस ई. के. पलानीस्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांची शनिवारी रात्री तिरुचिरापल्लीत विमानतळावर भेट घेतली. मोदी यांचे स्वागत करून त्यांनी काही वेळ चर्चा केली. एप्रिलमध्ये दोन्ही पक्षांत निवडणूक आघाडी झाल्यानंतरची ही पहिलीच भेट होती.
भगवान शिवमंदिरात पूजा
चोलकालीन भगवान बृहदेश्वर मंदिरात मोदी यांनी पूजा केली. पारंपरिक सजलेला कलश त्यांनी सोबत आणला होता. या मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेले आहे. शैव परंपरा आता पृथ्वीबाहेरही पोहोचली असल्याचे नमूद करून मोदी यांनी चांद्रयान-मोहिमेत विक्रम लँडर उतरले त्या स्थळास शिवशक्ती पॉइंट नाव देण्यात आल्याचे नमूद केले.