नवी दिल्ली: भारताने ऑपरेशन सिंदूरसाठी २१ दहशतवादी तळांची यादी तयार केली होती, यातील ९ ठिकाणी हल्ला करण्यात आला. सैन्याच्या कारवाईनंतर आणि पाकिस्तानने गुडघे टेकवल्यानंतर आता उर्वरित १२ दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी दबाव वाढला आहे.
या दहशतवादी तळांना संपविणे अद्याप बाकी, भारताच्या पुढील कारवाईकडे लक्ष
१. मस्कार-ए-अक्सा : पीओकेमध्ये लष्कर-ए-तैयबाचा कॅम्प आहे, पण दहशतवादी प्रशिक्षण आयएसआयकडून दिले जाते.
२. चेल्लाबंडी : मुजफ्फराबाद-नीलम हायवेवर लष्कर-ए-तैयबाचा तळ आहे. बैत-उल-मुजाहिद्दीन त्याचे नाव आहे.
३. अब्दुल बिन मसूद : हा तळ मनसेहरा परिसरात आहे. २०१९ च्या गुप्तचर विभागाच्या अहवालात याचा समावेश करण्यात आला होता.
४. दुलई : पीओकेमध्ये सध्या लष्कराचा गुप्त तळ असून, येथे शस्त्रे साठवली जातात. २०१५ मध्ये, भारताने पाकला दिलेल्या कागदपत्रात सांगितले होते की आयएसआयने तो तळ फक्त ३ वर्षात तयार केला होता. याचा अर्थ पाकिस्तान सरकार तो तळ चालवत आहे.
५. गढी हबीबुल्ला : हादेखील लष्कराचा गुप्त अड्डा मानला जातो. येथे शस्त्रास्त्रांचा मोठा साठा असण्याची शक्यता आहे. लष्कर येथे आत्मघातकी दहशतवादी प्रशिक्षणदेखील देते.
६. बतरसी : हा तळ मनशेरा जवळ आहे आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा एक तळ मानला जातो. २०१९ मधील गुप्तचर अहवालांमध्येही याचा उल्लेख आहे. येथे पाकिस्तानी सैन्य स्वतः दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते.
७. ओघी : हे जैशचे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र आहे. येथे दहशतवादीदेखील भरती केले जातात.
८. बालाकोट : पुलवामा हल्ल्यानंतर खैबर पख्तूनख्वा येथील या तळावर भारताने हल्ला केला. ते जैशसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे म्हटले जात होते. बालाकोटमधील इतर तळ पुन्हा सक्रिय झाल्याचे मानले जात आहे.
९. बोई : हा तळ पीओकेमध्ये आहे. ते हिजबुलचे लपण्याचे ठिकाण आहे. येथून रसद आणि शस्त्रे गोळा करून दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवली जातात.
१०. सेनसा : पीओकेमध्ये असलेला जैशचा आणखी एक तळ जिथे दहशतवाद्यांना गनिमी हल्ल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
११. बाराली : पीओकेमध्ये स्थित हा हिजबुल दहशतवादी तळ एका छोट्या गावात आहे.
१२. डुंगी : पीओकेमध्ये लष्करचा हा तळ आहे. येथेदेखील शस्त्रास्त्रांचा डेपो असल्याचा संशय आहे.