ऑपरेशन सिंदूर: त्या तीनपैकी एका चौकीचे नाव ठेवणार 'सिंदूर'; भारत-पाक सीमेवर सैन्याची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:31 IST2025-05-27T12:10:42+5:302025-05-27T12:31:10+5:30
India vs Pakistan: पाकिस्तानच्या गोळीला तोफगोळ्याने उत्तर देण्यात आले होते. या वर्षावात पाकिस्तानचे रेंजर जिवाच्या आकांताने त्यांची चौकी सोडून पळाले होते. याबाबत आज भारतीय सैन्याने महत्वाची अपडेट दिली आहे.

ऑपरेशन सिंदूर: त्या तीनपैकी एका चौकीचे नाव ठेवणार 'सिंदूर'; भारत-पाक सीमेवर सैन्याची मोठी घोषणा
पाकिस्तानची नांगी ठेचणारे ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधी तोडत सीमेवर जोरदार गोळीबार, उखळी तोफांचा मारा सुरु केला होता. याला भारतानेही तसाच तुफान प्रतिसाद दिला होता. पाकिस्तानच्या गोळीला तोफगोळ्याने उत्तर देण्यात आले होते. या वर्षावात पाकिस्तानचे रेंजर जिवाच्या आकांताने त्यांची चौकी सोडून पळाले होते. याबाबत आज भारतीय सैन्याने महत्वाची अपडेट दिली आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवानही शहीद झाले होते. बीएसएफच्या चौक्यांवर पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात आणि गोळीबारात बीएसएफचे सब-इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज, कॉन्स्टेबल दीपक कुमार आणि भारतीय लष्कराचे नाईक सुनील कुमार हे शहीद झाले होते. या तीन चौक्यांपैकी दोन चौक्यांना आमच्या शहीद झालेल्या जवानांचे नाव आणि एका पोस्टला सिंदूर हे नाव देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असे बीएसएफचे आयजी जम्मू शशांक आनंद यांनी जाहीर केले.
याचबरोबर बीएसएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी फॉरवर्ड ड्युटी पोस्टवर लढा दिल्याचेही त्यांनी सांगितले. असिस्टंट कमांडंट नेहा भंडारी यांनी एका पोस्टचे नेतृत्व केले. कॉन्स्टेबल मनजीत कौर, कॉन्स्टेबल मलकीत कौर, कॉन्स्टेबल ज्योती, कॉन्स्टेबल संपा आणि कॉन्स्टेबल स्वप्ना आणि इतरांनी हे पोस्ट सांभाळल्याचे ते म्हणाले.
आम्ही ७० हून अधिक पाकिस्तानी चौक्या आणि लाँच पॅडना लक्ष्य केले आणि त्यांचे नुकसान केले. यावेळी आमच्या बीएसएफ महिला जवानांनी सर्व विशेष शस्त्र प्रणालींमधून गोळीबार केला. बीएसएफच्या एका महिला अधिकाऱ्याने सीमा चौकीचे नेतृत्व देखील केले. मला आशा आहे की यामुळे देशातील महिलांना बीएसएफमध्ये सामील होण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानी दहशतवादाबद्दल भारतीय सर्वपक्षीय खासदारांच्या टीम परदेशांत जाऊन सांगत असताना भारतीय सैन्यानेही देशात ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्याचे अधिकारी सीमेवर काय काय घडत होते. आपण कसे पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले याबाबत जाहीरपणे सांगत आहेत. पाकिस्तानने भारताविरोधात सोशल मीडियावर प्रपोगेंडा राबविण्यास सुरुवात केली होती. भारताची एवढी विमाने पाडली, एवढी क्षेपणास्त्रे पाडली असे सांगितले जात होते. त्याला प्रत्यूत्तर म्हणून इंडियन आर्मीने भारतीय जनतेत जाण्यास सुरुवात केली आहे.