ऑपरेशन सिंदूरबाबत आता सैन्य दलच खुलासे करू लागले आहे. पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल हल्ले परतविण्यासाठी भारतीय सैन्याने काय काय केले, कोणती शस्त्रे वापरली याची माहिती दिली जात आहे. अशातच एका जवानाचा भारतीयांना विश्वास देणारा व्हिडीओ समोर येत आहे.
वृत्तसंस्था एएनआयने हे व्हिडीओ जारी केले आहेत. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले चढविले त्यापूर्वीपासून म्हणजेच पहलगाम हल्ला झाल्यापासून पाकिस्तानी सैन्य एलओसीवर तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवर जोरदार उखळी तोफांसह गोळीबार करत होता. सहा मे रोजीच्या रात्री पाकिस्तानवर भारताने एअर स्ट्राईक केला, त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी सायंकाळपासून भारतावर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले करण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी ८-९ मे च्या रात्री पाकिस्तानी लष्कराने गोळीबाराच्या माऱ्याखाली दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. यावेळचा प्रसंग भारतीय सैनिकाने विशद केला आहे. पाकिस्तानी चौकीवरून भारताच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरु होता. या ठिकाणाहून अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न केला जातो. यामुळे भारतीय चौकीवरील सैनिक सतर्क होते. रात्रीच्या वेळी समोरून गोळीबार सुरु झाला, तेव्हा नाईट व्हिजन डिटेक्शन सिस्टीमवर घुसखोरी होताना दिसत होती. भारतीय सैनिकांनी त्यांच्यावर अचूक मारा करून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.
यानंतर त्या पाकिस्तानी चौकीवर एवढ्या मोठ्या संख्येने गोळीबार, बॉम्ब फोडण्यात आले की पाकिस्तानी हैराण झाले. भारतीय सैनिक काही थांबत नाही असे वाटू लागताच पाकिस्तानने सकाळी पांढरा झेंडा फडकवत गोळीबार थांबविण्यासाठी गयावया करू लागला. हे सर्व आपल्या सैनिकाने सांगितले आहे. तसेच त्याने जोवर भारतीय सैन्य सीमेवर आहे तोवर देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, असा विश्वास या सैनिकाने भारतीयांना दिला आहे.