'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 20:15 IST2025-08-22T20:14:45+5:302025-08-22T20:15:16+5:30

रामबाबू कुमार सिंह शहीद झाल्याचं कळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. रामबाबू यांनी देशाच्या शत्रूंशी लढताना प्राणांची आहुती दिली त्यामुळे कुटुंबासह गावकरी त्यांच्यावर गर्व करतात

Operation Sindoor martyr Rambabu Kumar Singh wife anjali gave birth to daughter in Dhanbad | 'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

धनबाद - देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या शहीद जवान रामबाबू कुमार सिंह यांच्या पत्नीने २१ ऑगस्ट २०२५ रोजी एका मुलीला जन्म दिला आहे. कुटुंबाने या मुलीचे नाव राम्या ठेवले आहे, जे तिचे शहीद वडील रामबाबूच्या नावाशी जोडले आहे. मुलीच्या जन्मानंतर सिंह कुटुंबात ३ महिन्यांनी आनंद पसरला आहे परंतु शहीद मुलाच्या आठवणीने आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी आहे. 

रामबाबू यांना कायम एक मुलगी असावी अशी इच्छा होती. नशिबाने त्यांची इच्छा पूर्ण झाली परंतु दुर्दैव म्हणजे मुलीला पाहण्यासाठी आज ते या जगात नाहीत. शहीद रामबाबू यांची पत्नी अंजलीने सांगितले की, माझे पती कायम म्हणायचे, जर आपल्याला मुलगी झाली तर ती घराची शोभा वाढवेल. आज त्यांची इच्छा पूर्ण झाली. परंतु ते त्यांच्या लेकराला मायेने उचलून घ्यायला या जगात नाहीत. परंतु आम्हाला त्यांनी देशासाठी आपले प्राण दिले त्याचा गर्व आहे असं त्यांनी सांगितले. 

अंजली स्वत: एथलेटिक्समध्ये गोल्ड मेडलिस्ट राहिली आहे. मी माझ्या मुलीला त्याच हिंमतीने वाढवणार आहे जसं माझ्या पतीची इच्छा होती. राम्या केवळ त्यांची मुलगी नाही तर त्यांच्या धाडसाचं प्रतिक आहे असं अंजलीने म्हटलं. रामबाबू आणि अंजली यांच्या प्रेमाची सुरुवात २०१७ साली झाली होती. दीर्घ काळ एकमेकांसोबत राहिल्यानंतर १४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांचे लग्न झाले. मात्र लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यांनी आयुष्याने असं वळण घेतले आणि १४ मे २०२५ रोजी जम्मू काश्मीर येथे सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये रामबाबू हे देशाचं रक्षण करताना शहीद झाले. 

रामबाबू कुमार सिंह शहीद झाल्याचं कळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. रामबाबू यांनी देशाच्या शत्रूंशी लढताना प्राणांची आहुती दिली त्यामुळे कुटुंबासह गावकरी त्यांच्यावर गर्व करतात. आज रामबाबू यांच्या लेकीचा जन्म झाला, तिच्या आगमनाने कुटुंबाला जगण्याची नवी आशा मिळाली आहे. एकीकडे शहीद बापाची इच्छा पूर्ण झाली असं सांगतानाच चिमुकली बापाच्या प्रेमापासून वंचित राहिल्याचे वाईटही अनेकांना वाटत आहे. आता राम्याच्या रुपाने तिच्या वडिलांचे बलिदान कायमस्वरूपी सगळ्यांच्या आठवणीत राहील. मोठी झाल्यावर राम्यालाही सैन्यात पाठवू जेणेकरून ती तिच्या वडिलांच्या बलिदानाचा शत्रूशी लढून बदला घेईल असं तिचे कुटुंब म्हणते. 

Web Title: Operation Sindoor martyr Rambabu Kumar Singh wife anjali gave birth to daughter in Dhanbad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.