Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. यानंतर आता भारतीय लष्करातील मेजर, जवान यांचे काही व्हिडिओ समोर येत आहेत. या व्हिडिओमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत महत्त्वाची माहिती देताना भारतीय लष्करातील सैन्याधिकारी दिसत आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्यानंतर आता ही मोहीम कशी फत्ते करण्यात आली? दहशतवादी तळांना कशा प्रकारे उद्ध्वस्त केले? या संदर्भातील माहिती देण्यात येत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तराबाबत बोलताना भारतीय सैन्याच्या एका जवानाने या संपूर्ण कारवाईचे वर्णन करताना भारताने पाकिस्तानी गोळीबाराला कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले, याविषयी सांगितले आहे. “गोली उन्होंने चलाई, पर धमाका हमने किया”, असे सांगत भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईबाबत एका मेजरने इनसाइड स्टोरी सांगितली.
गोली उन्होंने चलाई, पर धमाका हमने किया...
‘ऑपरेशन सिंदूर’ ही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया नव्हती, तर एक नियोजनबद्ध तसेच टार्गेट ठेवून केलेला स्ट्राइक होता. आमचा हेतू अगदी स्पष्ट होता की, आम्हाला शत्रूचे दहशतवादी तळ आणि घुसखोरीला मदत करणाऱ्या चौक्या नष्ट करायच्या होत्या. मानसिक, धोरणात्मक आणि लॉजिस्टिकदृष्ट्याही आम्ही पूर्णपणे तयार होतो. आमच्याकडे स्वदेशी प्रगत रडार प्रणाली आणि विविध लक्ष्य साधणाऱ्या प्रणाली होत्या. आमच्या सैनिकांचा उत्साह, ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, असेही मेजर म्हणाले.
भविष्यात काहीही करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील
पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू होते. परंतु, मी अभिमानाने सांगू शकतो की, आमच्याकडून कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमचे ध्येय त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे होते. जेव्हा त्यांनी आमच्या नागरी क्षेत्रावर आणि लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करायला सुरुवात केली तेव्हा आमचा हेतू स्पष्ट होता की, जर त्यांनी आमच्या गावावर गोळीबार केला तर आम्ही त्यांची चौकी नष्ट करू. आमची प्रत्येक गोळी त्यांना उत्तर होती. आम्ही खात्री केली की, कोणताही नागरिक मारला जाणार नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ ने केवळ त्यांच्या चौक्याच नष्ट केल्या नाहीत, तर त्यांचे मनोबलही संपुष्टात आणले. आता आमची वेळ होती आणि आम्ही त्याचे सोने करून दाखवले. आम्ही असे उत्तर दिले आहे की, ते ही कारवाई कायमची लक्षात ठेवतील आणि भविष्यात काहीही करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील, असे मेजर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ९ दहशतवादी तळांवर करत दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर केलेल्या ड्रोन हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून केलेल्या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलाकडून देण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत अद्यापही नवनवीन माहिती हाती येत आहे.