भारत-पाकिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात जोरदार हवाई युद्ध झाले होते. यात भारताने पाकिस्तानचे शेकडो ड्रोन हल्ले फोल ठरविले. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम सुदर्शन चक्र कमालीची यशस्वी ठरली होती. यामुळे तुर्कीची ड्रोन वापरूनही पाकिस्तान भारताचे काहीही वाकडे करू शकला नाही. दोन्ही बाजुंनी युद्धविराम झाल्यानंतर आता राजस्थानात संशयास्पदरित्या कोसळलेला एक ड्रोन सापडला आहे.
ज्या भागात हा ड्रोन सापडला तो भाग पाकिस्तान सीमेपासून १५ किमी लांब आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगढ क्षेत्रात हा तुटलेला ड्रोन सापडला आहे. स्थानिकांना हा ड्रोन दिसला आहे. त्यांनी याची माहिती त्वरित पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाला दिली आहे. माहिती मिळताच अनुपगढ पोलीस आणि बीएसएफचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत व तपास करत आहेत.
सांगाड्यावरून हा ड्रोन लष्करी ड्रोन असल्याचे स्पष्ट होत आहे. या ड्रोनद्वारे तस्करी किंवा हेरगिरी तर करण्यात आली नाही ना, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत. वृत्तसंस्था आयएएनएसने याचा व्हिडीओ जारी केला आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानने भारताच्या सीमेनजीकच्या शहरांवर हल्ला केला होता. यावेळी भारताने पाकिस्तानचे शेकडो ड्रोन पाडले होते. सलग दोन-तीन रात्री पाकिस्तानी सैन्य तुर्कीच्या मदतीने हल्ला करत होते. भारताने देखील प्रतिहल्ला केला होता. यात पाकिस्तानचे हवाई दलाचे तळ उध्वस्त करण्यात आले आहेत. एलओसीवर देखील भारताने पाकिस्तानच्या चौक्या उडविल्या आहेत.
यानंतर पाकिस्तान शरण येत शस्त्रसंधी करण्याची गळ घालू लागला होता. क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली S-400 ने पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने हवेतच पाडली. ड्रोन हल्ले प्रभावीपणे निष्क्रिय करण्यात आले. यामुळे पाकिस्तानकडे भारताला भेदण्याची क्षमताच राहिली नाही, जमिनीवरील युद्ध पाकिस्तान कदापी जिंकू शकलेला नाही, यामुळे पाकिस्तानने युद्धविमार करण्याची मागणी केली होती. याकडे जग आता भारताने पाकिस्तानची चांगलीच जिरविली, या नजरेने पाहत आहे. जगभरातील तज्ञ देखील आता हेच म्हणत आहेत.