"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 17:17 IST2025-05-10T17:17:03+5:302025-05-10T17:17:26+5:30
माजी सैनिक सुखविंदर पाल म्हणाले की, आम्ही यापूर्वीही देशाची सेवा केली आहे, आताही गरज पडल्यास आम्ही मागे हटणार नाही. हे गाव आमचं आहे, देश आमचा आहे.

"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
पंजाब, काश्मीर आणि जम्मूच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये गोळीबाराचा आवाज येत असला तरी तिथे राहणारे लोक घाबरले नाहीत. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याच्या ते तयारीत आहेत. हल्ला झाल्यास नेमकं काय करायचं हे महिला त्यांच्या मुलांना शिकवत आहेत आणि माजी सैनिक तरुणांना देश आधी येतो, मग सर्व काही... हे समजावून सांगत आहेत. "आम्ही गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू" असा निर्धार पंजाबपासून काश्मीरपर्यंत करण्यात आला आहे.
फिरोजपूर सीमेवरील महवा गावातील लोकांनी आजतकने संवाद साधला. लोक म्हणाले की १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही आम्ही कुठेही गेलो नाही. यावेळीही जाणार नाही. जवानांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं आहे त्याच्यासोबत आम्ही उभे आहोत. जे काही लागेल ते आम्ही करू - अगदी आमचा जीवन देऊ. गावच्या सरपंच निर्मला देवी यांनी आधीच गावकऱ्यांना घरी रेशन आणि पाणी साठवून ठेवण्यास सांगितलं आहे आणि मुलांना कठीण परिस्थितीत काय करावे हे शिकवण्यास सांगितलं आहे. युद्ध झालं तरी आम्ही गाव सोडणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं आहे असं म्हटलं.
"पाकिस्तान आपल्याला हादरवू शकत नाही"
माजी सैनिक सुखविंदर पाल म्हणाले की, आम्ही यापूर्वीही देशाची सेवा केली आहे, आताही गरज पडल्यास आम्ही मागे हटणार नाही. हे गाव आमचं आहे, देश आमचा आहे - पाकिस्तान आपल्याला हादरवू शकत नाही. उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी हल्ल्यांनंतरही गावांमध्ये भीतीचे वातावरण नाही. लोक सामान्य जीवन जगत आहेत. एका स्थानिक ग्रामस्थाने सांगितलं की पाकिस्तान कधीही जिंकला नाही, आता तो हॅटट्रिक करेल. पाकिस्तानला काश्मीरमध्ये शांतता आवडत नाही, म्हणूनच तो हल्ला करत आहे, पण आम्ही आमच्या सैन्यासोबत आहोत तेही पूर्ण ताकदीने.
"हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ”
फिरोजपूरचे शेतकरी म्हणतात की ही आमची जमीन आहे, पण आम्हाला भीती वाटत नाही. आम्ही सैन्यासोबत आहेत. आपण आधी संकटाचा सामना करतो. आम्हाला माघार कशी घ्यायची हे माहित नाही. बोट चालवणाऱ्या गावकऱ्याने सांगितलं की, आम्हाला पाकिस्तानच्या कारवायांची भीती वाटत नाही. गरज पडली तर आपण बोट सोडून बंदूक उचलू. हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ असं लोक म्हणत आहेत. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.