नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १० मे पर्यंत ९ विमानतळ बंद राहतील. त्यात जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, राजकोट, भूज, श्रीनगर, लेह आणि जामनगर एअरपोर्टचा समावेश आहे. भारताच्या प्रमुख एअरलाइन्सने त्यांच्या उड्डाणांबाबत सोशल मिडिया प्लॅटफोर्म एक्सवर माहिती शेअर केली आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकवर स्ट्राईक केला. त्यात ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली.
Indigo Airlines ने १६० डोमेस्टिक फ्लाईट्स रद्द केल्यात. दिल्ली एअरपोर्टवरून विविध विमान वाहतूक कंपन्यांनी २० फ्लाईट्स रद्द केल्यात. २२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर १५ दिवसांनी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले आहे. या स्ट्राईकनंतर भारतीय विमान वाहतूक सेवेवर खबरदारी म्हणून काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
एअर इंडियाने जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड, राजकोट इथल्या सर्व फ्लाईट्स १० मे सकाळी ५.२९ मिनिटांपर्यंत रद्द केल्या आहेत. त्याशिवाय सीमा भागातील शहरांमध्ये आणि संवेदनशील भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबच्या अनेक भागात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट करत त्यावर मिसाईल हल्ला केला. सैन्याच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आले. या हल्ल्यात अशा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले जिथून भारताविरोधात दहशतवादी कट रचला जातो.
पाकिस्तानी एअरस्पेस रिकामा
भारताच्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानी एअरस्पेस ओस पडला आहे. पाकिस्तानने देशातील विमान सेवा खंडीत केली आहे. इस्लामाबाद विमानतळापासून देशातील अनेक विमान उड्डाणे रद्द केलीत. अनेक प्रमुख देशांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून विमान प्रवास करणे टाळले आहे. पुढील सूचना येईपर्यंत दक्षिण आशियातील भारत-पाकिस्तानच्या हवाई हद्दीतील विमान सेवा फ्रान्सने निलंबित केली आहे. ब्रिटीश एअरवेज, स्वीस इंटरनॅशनल, अमीरातसह अनेक उड्डाणे अरबी समुद्रातून प्रवास करत दिल्लीला पोहचत आहेत.