पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील एका दहशतवाद्याला ठार करण्यात आपल्या सैन्याला ९८ दिवसांनी यश आले आहे. त्या दहशतवाद्यांनी वापरलेल्या सॅटेलाईट फोनमुळे मुसा या दहशतवाद्याचा ठावठिकाणा सैन्याला सापडला आणि सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास तीन दहशतवाद्यांना शोधून ठार करण्यात आले. या ऑपरेशन महादेव मोहिमेवर आता पाकिस्तान आगपाखड करू लागला आहे.
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सुलेमान शाह हा पाकिस्तानी लष्कराच्या एलिट युनिट स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा माजी कमांडो होता. सुलेमानने सप्टेंबर २०२३ मध्ये भारतात घुसखोरी केली आणि दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया केल्या. यावर पाकिस्तान चिडला आहे. भारतीय एजन्सी चकमकीत ताब्यात घेतलेल्या पाकिस्तानींना मारत आहेत, असे ओरडू लागल्या आहेत. एवढे नाही तर पाकिस्तानच्या सरकारी एजन्सी या दहशतवाद्यांना निष्पाप पाकिस्तानी म्हणत आहेत.
पाकिस्तानचे इंग्रजी वृत्तपत्र 'डॉन'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. यामध्ये पाकिस्तानी सुरक्षा सूत्र ऑपरेशन महादेवच्या नावाखाली भारत बनावट चकमकी घडवत असल्याचे म्हटले आहे. भारतीय यंत्रणा भारताने जबरदस्तीने ताब्यात घेतलेल्या पाकिस्तानींना बनावट चकमकीत वापरत असून त्यांना सीमेपलीकडून आलेले दहशतवादी म्हणत आहेत, असा कांगावा आता पाकिस्तानने करण्यास सुरुवात केली आहे.
भारतावर हे खोटेनाटे आरोप करताना पाकिस्तानी वृत्तपत्र आणि त्यांचे सुरक्षा सूत्र काश्मीरच्या जंगलात एक पाकिस्तानी नागरिक सॅटेलाइट फोन आणि शस्त्रास्त्रांचा साठा घेऊन काय करत होता, हे मात्र सांगत नाहीएत. एवढेच नाही तर पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद चौधरी शरीफ यांच्या म्हणण्यानुसार भारतीय तुरुंगांमध्ये ७२३ पाकिस्तानी नागरिक बंद आहेत. त्यांचा वापर पाकिस्तानविरुद्ध विधाने करण्यासाठी केला जाऊ शकतो, असा आरोप केला आहे. परंतू हे पाकिस्तानी भारतात कोणत्या मार्गाने आले हे मात्र पाकिस्तानी लष्कर सांगत नाहीय.