रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 06:20 IST2025-05-09T06:20:23+5:302025-05-09T06:20:40+5:30
जम्मूमध्ये आठ क्षेपणास्त्रे, ड्रोन पाडली; सतर्कतेचे आदेश

रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
सुरेश एस. डुग्गर
लोकमत न्यूज नेटवर्क
जम्मू: भारताने नऊ शहरांमध्ये हल्ले केल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता जम्मू शहर व अन्य ठिकाणी हल्ले करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावला. पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे व काही ड्रोन भारताने पाडले आहेत. त्यानंतर भारताने मध्यरात्री पाकच्या अनेक शहरांवर हल्ला केल्याचे वृत्त होते.
पाकिस्तानकडून हल्ला सुरु होताच जम्मू शहरात पूर्ण ब्लॅकआउट करण्यात आले. पाकिस्तानने जम्मू शहर, जम्मू विमानतळाच्या दिशेने डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे, ड्रोन भारतीय लष्कराने पाडली. पाकिस्तानचा हल्ला रोखण्यासाठी भारताने एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर केला. हवाई हल्ला होण्याचा इशारा देत जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. तिथे सतत धोक्याचा इशारा देणारे सायरन वाजत होते. त्याचप्रमाणे राजस्थानसह अन्य काही भागांतही ब्लॅकआउट करण्यातआला असून तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानच्या लष्कराने गुरुवारी रात्री आरएसपुरा सीमेवर भीषण गोळीबार सुरु केला असून, राजौरी शहरातही तोफगोळ्यांचा मारा केला, त्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने अखनूर, सांबा आणि पठाणकोट या भागांवरही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याला अद्याप संरक्षण दलाकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.
गृहमंत्री शाह यांची सीमा दल प्रमुखांशी चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी रात्री देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सीमा सुरक्षा दलासह इतर सुरक्षा दलांच्या प्रमुखांशी संवाद साधला, अशी माहिती सूत्रांनी दिली. श्रीगंगानगर, बाडमेर, जैसलमेर, बिकानेर, जोधपूर या राजस्थानातील सीमावर्ती भागातील शहरांमध्ये ब्लॅक आऊट लावण्यात आला.