मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 17:07 IST2025-05-01T17:05:21+5:302025-05-01T17:07:37+5:30
या घटनेसंदर्भात २६ एप्रिल रोजी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती डीएसपी रश्मीत कौर चावला यांनी दिली.

मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) कॅम्पदरम्यान बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला गुरुवारी अटक करण्यात आली. दिलीप झाल असे या प्राध्यापकाचे नाव आहे. तत्पूर्वी, या घटनेसंदर्भात २६ एप्रिल रोजी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती डीएसपी रश्मीत कौर चावला यांनी दिली.
१५९ विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडले -
दिलीप झा, सहा प्राध्यापक आणि एका विद्यार्थ्यावर भारतीय न्याय संहिता आणि छत्तीसगड धर्म स्वातंत्र्य कायद्यांतर्गत धर्माच्या आधारावर द्वेष पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ मार्च रोजी आरोपींनी एनएसएस कॅम्पमधील १५९ विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडले होते. यांपैकी केवळ चार मुस्लीम विद्यार्थी होते. कोटा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिवतराई गावात २६ मार्च ते १ एप्रिल दरम्यान या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
कॅम्पमधून परतल्यानंतर विद्यार्थ्यांकडून घटनेचा निषेध -
कॅम्पमधून परतल्यानंतर विद्यार्थ्यांनी झालेल्या घटनेचा निषेध केला. तसेच, हिंदू संघटनांनीही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. बिलासपूरचे एसपी रजनीश सिंह यांनी चार सदस्यांची समिती स्थापन केली होती. शहर अधीक्षक (कोतवाली) अक्षय सबादरा यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी करण्यात आली. समितीच्या अहवालाच्या आधारे झा आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच इतर लोकांविरुद्धही चौकशी सुरू असल्याचे चावला यांनी सांगितले.