केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 05:50 IST2025-07-23T05:50:36+5:302025-07-23T05:50:51+5:30
१८ महिन्यांच्या संसारासाठी तब्बल १२ कोटी रुपयांची पोटगी मागणाऱ्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले.

केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले...
नवी दिल्ली : १८ महिन्यांच्या संसारासाठी तब्बल १२ कोटी रुपयांची पोटगी मागणाऱ्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले असून, तुम्ही एमबीए झालेल्या आहात, स्वत: कमवायला पाहिजे, असे सुनावले आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले की, कोणतीही शिक्षित महिला फक्त बसून राहीन व काम करणार नाही असे ठरवू शकत नाही. एक तर फ्लॅट किंवा ४ कोटी एकरकमी पैसे देण्याच्या प्रस्तावावर कोर्टाने आदेश राखून ठेवला.
या प्रकरणात दोघांच्या विवाहाला १८ महिने होत आहेत. पतीने पत्नी सिझोफ्रेनियाची (मानसिक आजार) रुग्ण असल्याचे सांगून विवाह संपुष्टात आणण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. याच्या उत्तरात पत्नीने पोटगीसाठी दावा केला आहे.
पतीचे उत्पन्न किती?
तिच्या पतीचे २०१५-१६मधील वार्षिक उत्पन्न २.५ कोटी होते. यात १ कोटी बोनस होता. पत्नीकडे एक फ्लॅट व दोन कार पार्किंग्ज आहेत. त्यातून तिला उत्पन्न मिळते. बीएमडब्ल्यू कार १० वर्षे जुनी आहे व ती केव्हाच भंगारात निघाली असल्याचे सांगण्यात आले.
कोर्ट म्हणाले, प्रत्येक महिन्यासाठी १ कोटी कशाला?
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील पीठाने पत्नीचा दावा, तिची शैक्षणिक पातळी व विवाहाचा अल्पकाळ यासंदर्भात सविस्तर आढावा घेतला. सरन्यायाधीशांनी तिच्या नोकरी करण्याच्या अनिच्छेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तुम्ही आयटी क्षेत्रातील आहात. तुम्ही एमबीए केलेले आहे. तुम्हाला बंगळुरू, हैदराबाद येथे मागणी आहे. तुम्ही काम का करत नाही? १८ महिन्यांच्या संसारासाठी एवढी मोठी रक्कम कशी काय मागता.तुम्हाला बीएमडब्ल्यू पाहिजे? प्रत्येक महिन्यासाठी एक-एक कोटी पाहिजे? पत्नी पतीच्या वडिलांच्या संपत्तीवर दावा करू शकत नाही. एफआयआरमुळे नोकरी न मिळण्याच्या तिच्या चिंतेवर कोर्टाने म्हटले की, आम्ही तो रद्द करू. शिक्षित व्यक्तीला आपल्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही एवढ्या शिकल्या-सवरलेल्या आहात आणि तुमच्या मनाप्रमाणे काम करू शकत नाहीत? तुम्ही स्वत:हून मागितले नाही पाहिजे. स्वत: कमावून खाल्ले पाहिजे, असेही सरन्यायाधीशांनी महिलेला सुनावले.
प्रकरण नेमके कुठले?
मुंबईच्या कल्पतरू कॉम्प्लेक्समध्ये बिनाकर्ज फ्लॅट व १२ कोटींची एकरकमी पोटगी मागितली आहे. माझा पती खूपच श्रीमंत आहे, असा दावा तिने केला आहे. मानसिक आजाराचा पतीने केलेला आरोप तिने फेटाळला आहे.
मी सिझोफ्रेनिक वाटते का, असे तिने म्हटले आहे. त्याचबरोबर तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल असल्यामुळे तिला नोकरी मिळण्यात अडचणी येतील, असेही सांगितले आहे. पतीने माझ्या वकिलाला प्रभावित केले आहे, असा आरोपही तिने केला आहे. पतीची बाजू मांडणाऱ्या वरिष्ठ अधिवक्ता माधवी दिवाण यांनी पत्नीची मागणी खूपच जास्त असल्याचे म्हटले आहे.
पत्नीसमोर ठेवले पर्याय
पीठाने पत्नीसमोर स्पष्ट पर्याय ठेवले. एक तर तुम्ही कोणताही वादात नसलेला फ्लॅट घ्यावा किंवा काहीच नाही किंवा ४ कोटी घ्यावे व एक चांगली नोकरी पाहावी. तिच्या विरोधातील एफआयआर रद्द करण्याचा प्रस्तावही या संभाव्य समझोत्याचा भाग आहे.