ऑनलाइन गेमिंमध्ये २ लाख गमावले; डॉक्टरांकडे किडनी विकायला गेला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:04 IST2025-09-10T18:04:28+5:302025-09-10T18:04:45+5:30
Online Gaming: ही घटना आता परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

ऑनलाइन गेमिंमध्ये २ लाख गमावले; डॉक्टरांकडे किडनी विकायला गेला, पण...
Online Gaming: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात ऑनलाइन गेमिंचा व्यवसाय झपाट्याने वाढला. यामुळे काहींना फायदा, मात्र अनेकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. अलिकडेच केंद्र सरकारने नवीन कायद्याद्वारे ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातली आहे. अशातच, बिहारमधील गोपाळगंज येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाने ऑनलाइन गेमिंगमध्ये लाखो रुपये गमावले. त्यानंतर डॉक्टरकडे किडनी विकण्यासाठी गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजित कुमार असे या तरुणाचे नाव आहे. तो तरैया गावात फोटो स्टुडिओ चालवतो. एके दिवशी इंस्टाग्रामवर जाहिरात पाहून त्याला डीबीजी नावाचा ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन लागले. सुजित कुमारने पहिल्यांदाच गेममध्ये १० हजार रुपये गुंतवून ३० हजार जिंकले. त्यानंतर श्रीमंत होण्याची इच्छा वाढत गेली. त्याने बाईक खरेदी करण्याच्या बहाण्याने आपल्या मामाकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि सगळे पैसे या गेममध्ये लावले.
मात्र, गेममध्ये त्याचा पराभव झाला आणि त्याने सर्व पैसे गमावले. मामाने पैसे परत मागितले, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळेच, या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने वेगळीच शक्कल लढवली. तो एका खासगी डॉक्टरकडे गेला आणि पैंशाची गरज असल्यामुळे किडनी विकण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, डॉक्टर आणि स्थानिकांनी त्याला समजावून सांगितले आणि घरी पाठवले. माहिती मिळताच सुजीतची आई आणि त्याचे काही नातेवाईक तिथे पोहोचले आणि त्याला घरी परत घेऊन गेले. ही घटना आता परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.