बंदरांवर निर्यातीच्या प्रतीक्षेत असलेल्या 100 कोटींच्या कांद्याचं काय करायचं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 05:27 PM2020-09-19T17:27:44+5:302020-09-19T17:28:32+5:30

केवळ कस्टम्सकडे सोपविलेल्या कांद्याच्या निर्यातीसच मुभा

onions worth rs 100 crore at ports after modi government bans export | बंदरांवर निर्यातीच्या प्रतीक्षेत असलेल्या 100 कोटींच्या कांद्याचं काय करायचं? 

बंदरांवर निर्यातीच्या प्रतीक्षेत असलेल्या 100 कोटींच्या कांद्याचं काय करायचं? 

Next

- योगेश बिडवई

मुंबई : केंद्र सरकारने १४ सप्टेंबरपासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी ज्या निर्यातदरांनी त्या दिवसापर्यंत निर्यात करण्याचे त्यांचे कांद्याचे साठे बंदरांमध्ये आणून तपासणीसाठी कस्टम्स विभागाकडे सुपूर्द केले होते त्यांना ही बंदी लागू होणार नाही, असे विदेश व्यापार महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे. मात्र बंदरांवर निर्यातीसाठी कंटेनरमध्ये भरून तयार असलेला व बांगलादेश आणि नेपाळ सीमेवर उभे असलेले ट्रक यांच्यातील तब्बल 35 हजार टन म्हणजे 100 कोटींच्या कांद्याचे काय करायचे, असा प्रश्न निर्यातदारांनी मोदी सरकारला विचारला आहे. 

नेपाळ, बांगलादेश सीमेवर कस्टम्सकडे सोपविलेल्या कांद्याच्या निर्यातीचा मार्गही  मोकळा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र तेथेही कस्टम्सकडे न सोपविलेला कोट्यवधींचा कांदा आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदरावर तब्बल 350 कांद्याचे कंटेनर उभे आहेत. त्यातील बराचसा माल कस्टम्सकडे सोपविलेला नाही. त्याचेही काय करायचे, असा प्रश्न आहे. तो माल निर्यात न झाल्यास कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. त्याचा फटका शेवटी देशातील भाव पडून शेतकऱ्यांना बसेल. 

निर्यातबंदीची अधिसूचना प्रसिद्द झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी केंद्रीय सीमाशुल्क मंडळाने (सेंट्रल कस्टम्स बोर्ड) यासंबंधी खुलासा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार खुलासा करणारा ई-मेल निर्यात व्यापार महासंचालनालयातील एक उप महासंचालक (निर्यात) नितिश सुरी यांनी कस्टम्स बोर्डास शुक्रवारी पाठविला आहे. त्यात मालाच्या निर्यातीची तारीख कोणती धरावी यासंबंधीच्या नियमाचा हवाला देऊन असे नमूद करण्यात आले की, ज्यावेळी धोरणात केलेला बदल निर्यातदारांना प्रतिकूल असेल तेव्हा हे सुधारित धोरण, ज्यांनी सुधारित अधिसूचना निघण्याच्या तारखेपर्यंत आपला निर्यातीचा माल बंदरांमध्ये आणून तपासणीसाठी कस्टम्स विभागाकडे सुपूर्द केला आहे, त्यांना लागू होणार नाही. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणारी अधिसूचना ज्या तारखेला प्रसिद्ध झाली तोपर्यंत वरीलप्रमाणे बंदरांमध्ये आणून कस्टम्सकडे सुपूर्द केलेला कांदा हा ‘निर्यातीच्या प्रक्रियेत असलेला माल’ ठरत असल्याने अशा कांद्याला ही निर्यातबंदी लागू होणार नाही.

त्यामुळे कस्टम्स मंडळाने बंदरांमधील त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना अशा प्रकारे निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या कांद्याच्या निर्यातीस आडकाठी करू नये, असेही विदेश व्यापार संचालनालयाला कळविले आहे.

बंदरांवर अडकलेल्या 35 हजार टन कांद्याच्या निर्यातीचे काय? 
मुंबई बंदरावर 350 कंटेनर सोमवारपासून थांबले आहेत. दक्षिणेत बंदरांवर 100 कंटेनर, सीमेवर सुमारे 200 ट्रक कांदा निर्यातबंदीमुळे अडकला होता. हा सुमारे 35 हजार टन म्हणजे 100 कोटींचा कांदा आहे. तो सर्व निर्यात होतो का, हे पाहावे लागेल. 
- अजित शाह, अध्यक्ष, अखिल भारतीय कांदा निर्यातदार संघटना

Web Title: onions worth rs 100 crore at ports after modi government bans export

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा