एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 21:34 IST2025-04-20T21:34:04+5:302025-04-20T21:34:56+5:30
RSS Chief Mohan Bhagwat: आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी अलिगढ दौऱ्यात सामाजिक एकतेवर भर दिला.

एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
Mohan Bhagwat On Casteism: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदू समाजाला जातीभेद संपवण्याचे आवाहन केले आहे. 'एक मंदिर, एक विहीर आणि एक स्मशानभूमी' हे धोरण स्वीकारुन सर्व जातींमध्ये सुसंवाद आणि समानता आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अलिगढच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर असलेले मोहन भागवत यांनी एचबी इंटर कॉलेज आणि पंचन नगरी पार्क या दोन मुख्य शाखांमध्ये स्वयंसेवकांना संबोधित केले. ते म्हणाले की, आपल्याला सर्व वर्गांना समान आदर द्यायला हवा. हा आपला धर्म आणि आपली संस्कृती आहे.
संस्कृती आणि मूल्ये आरएसएसचा पाया
सामाजिक सौहार्द वाढविण्यासाठी संस्कार, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांवर भर देण्यास आरएसएस प्रमुखांनी स्वयंसेवकांना सांगितले. ते म्हणाले, आपल्याला असा समाज निर्माण करायचा आहे, जो केवळ सक्षमच नाही, तर समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाईल. आपले सण हे केवळ उत्सव नाहीत, तर ते सामाजिक ऐक्याचे प्रसंगदेखील आहेत. त्यांनी सर्व वर्गातील लोकांना एकत्रितपणे हा सण साजरा करण्याचे आवाहन केले.
संघाच्या शताब्दी महोत्सवाची तयारी
यावर्षी विजयादशमीपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाच्या तयारीचा एक भाग म्हणून भागवत यांचा दौरा महत्वाचा आहे. यामध्ये ब्रज प्रदेशातील संघ प्रचारकांशी नियमित बैठका देखील समाविष्ट होत्या. त्यांनी संघटनात्मक रचना मजबूत करण्याबाबत आणि भविष्यात राष्ट्रीय पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा यावरही चर्चा केली.