Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 21:06 IST2025-08-22T21:04:53+5:302025-08-22T21:06:13+5:30

सेन्थिल हे माझे नातेवाईक होते आणि या अपघातासाठी वाहनाच्या समन मोडचा दोष जबाबदार आहे. यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येत असल्याचेही रेडिटवर एका युजरने दावा केला आहे.

One killed in Tata Harrier electric vehicle accident in Tamil Nadu, video goes viral | Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

अविनाशी - तामिळनाडू येथील एका अपघाताच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. १४ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ५:५३ वाजता घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात टाटा हॅरियरच्या इलेक्ट्रिक वाहनाच्या 'समन मोड' (Summon Mode) मुळे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेने इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वयंचलित फिचर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात वाहन उतारावरून मागे सरकत असल्याचे दिसत आहे. ज्यामुळे वाहनाच्या ड्रायव्हरच्या बाजूने उभी असलेल्या एका व्यक्तीच्या अंगावरून वाहन जाते, त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला आहे. 

या अपघातातील मृत व्यक्तीचे नाव सेन्थिल असून ते अविनाशी येथील एका दुकानाचे मालक होते. सेन्थिल यांनी नुकतीच टाटा हॅरियर ईव्ही खरेदी केली होती. अपघाताच्या वेळी ते वाहनात चढण्याचा प्रयत्न करत असताना वाहन अचानक मागे सरकले आणि ते खाली पडले. उताराने मागच्या बाजूस हे वाहन आले आणि त्यांच्या अंगावरून चाक गेले. ज्यामुळे सेन्थिल यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सेन्थिल यांच्या अपघाती मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सेन्थिल हे माझे नातेवाईक होते आणि या अपघातासाठी वाहनाच्या समन मोडचा दोष जबाबदार आहे. यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येत असल्याचेही रेडिटवर एका युजरने दावा केला आहे. 

समन मोड म्हणजे काय? 

टाटा हॅरियर ईव्हीमध्ये हे एक प्रगत अपग्रेडेड फिचर दिले आहे, जे वाहनाच्या की फॉब किंवा ॲपद्वारे रिमोट कंट्रोल केले जाते. हे वैशिष्ट्य पार्किंगसाठी उपयुक्त आहे, ज्यात वाहन स्वयंचलितपणे पार्क इन किंवा पार्क आऊट करू शकते. ड्रायव्हर आत नसतानाही वाहन चालकाविना चालते. टाटा मोटर्सने याला 'समन मोड' असे नाव दिले आहे. हे वैशिष्ट्य पार्किंगच्या जागेत वाहन हळूहळू पार्क करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. पण ते सपाट जागेवरच वापरण्याची सूचना दिली जाते. उतारावर किंवा असुरक्षित ठिकाणी वापरल्यास धोका निर्माण होऊ शकतो.

तामिळनाडूतील या अपघाताची कारणे स्पष्ट नाहीत. टाटा कंपनीनेही या घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे. आम्हाला या अपघाताची माहिती मिळाली आणि आम्ही या घटनेने खूप दुःखी आहोत. आमच्या संवेदना मृताच्या कुटुंबासोबत आहे. आम्ही अपघाताशी संबंधित सर्व माहिती जमा करत आहोत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओच्या प्राथमिक निरीक्षणानुसार, वाहन उतारावर असल्याने ते मागे येऊन धडकलेले दिसते. त्यात वाहन सुरू असल्याचं दिसत नाही. वाहन कुटुंबाकडे आहे आणि अपघातानंतर चालवले गेले आहे, आम्ही संबंधित वाहनाचीही चाचणी करू असं कंपनीने म्हटलं आहे. दरम्यान, या घटनेने इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेवरती सोशल मीडियात विविध चर्चा सुरू झाली आहे. 

Web Title: One killed in Tata Harrier electric vehicle accident in Tamil Nadu, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.