चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांत मुंबईसह तीन मोठ्या शहरांमध्ये गुरुवारपासून २४ रुपयांत एक किलो कांदा उपलब्ध हाेणार आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या योजनेचा शुभारंभ केला. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या तीन शहरांत २४ रुपयांत कांदा उपलब्ध झाला आहे.
कांद्याची विक्री नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडारच्या माध्यमातून होणार आहे. ही योजना डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कांद्यासोबतच टोमॅटो ३० रुपये किलो दराने मिळेल. पहिल्या टप्प्यात २५ टन कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र, कांद्याचा दर तीस रुपयांच्या वर गेल्यास अन्य शहरांमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सरकारकडे सध्या तीन लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक आहे. हा कांदा १५ रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला असून, किंमत स्थिरीकरण निधी (पीएसएफ) अंतर्गत साठवण्यात आला आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि किमती स्थिर ठेवण्यासाठी या कांद्याचा आवश्यकतेनुसार उपयोग केला जातो. ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे म्हणाल्या की, उत्तम व्यवस्थापन आणि २७% अधिक उत्पादनामुळे या वर्षी कांद्याच्या किमती वाढल्या नाहीत. २०२४-२५ मध्ये कांद्याचे उत्पादन ३०७ लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे.
आटा-तांदूळ योजनेचा विस्तारकांदा आणि टोमॅटोसोबतच सरकारने भारत ब्रँड आटा-तांदूळ योजनेचाही विस्तार केला आहे. याअंतर्गत, पीठ ३१.५० रुपये प्रतिकिलो, तांदूळ ३४ रुपये प्रतिकिलो आणि डाळी देखील अनुदानित दराने उपलब्ध असतील.